जीवनात तत्त्व व व्यवहार यांचा समन्वय कसा साधावा यासंबंधी
प.पू. श्री १०८ समन्तभद्र महाराज यांचेशी झालेली उद्बोधक तत्त्वचर्चा
(नव्या स्वरूपात पुनर्मुद्रित)
• संकलन •
जिज्ञासू संवादकर्ता
स्व. श्रीपाल शिवलाल शहा, कोल्हापूर
❖ अध्यात्म - नवनीत
❖ संकलन : जिज्ञासू संवादकर्ता - श्रीपाल शिवलाल शहा, कोल्हापूर
❖ सुधारित आवृत्ती : पाचवी
❖ प्रकाशन दिनांक : श्रा.शु. पंचमी, शके १९३९, दि. २७ जुलै, २०१७
❖ प्रकाशक :
अतुल श्रीपाल शहा,
E-mail : shahatul1@gmail.com
❖ अक्षर जुळवणी -
सौ. अनिता विनायक भालेराव,
क्रिएशन, 'जयश्री', एन-१, सिडको,
औरंगाबाद-४३१ ००३.
फोन - (०२४०) २४८६९१०
❖ मुद्रक -
रुद्रायणी ऑफसेट
औरंगाबाद.
श्री अतिशय क्षेत्र बाहुबली येथे प.पू. गुरुदेवश्री १०८ समंतभद्र महाराजांच्या सान्निध्यात कोल्हापूरनिवासी स्व.श्री. श्रीपाल शिवलाल शहा (गुरुदेव समंतभद्रांचे अनन्य भक्त व शिष्य पुर्वाश्रमीचे पुतणे) यांना महाराजांच्या अमृतमय वाणीचा रसास्वाद चाखण्याची सुवर्णसंधी लाभली. दैनंदिन जीवनात तत्त्व व व्यवहार यांची सांगड कशी घालावी यासंबंधी खूपच उद्बोधक चर्चा घडली होती. जणू वाचकाचे प्रश्न आहेत आणि गुरुदेवश्री त्याचे समर्पक उत्तर देत आहेत असे वाचकास वाटते, शंकांचे समाधान मिळते. वर्षानुवर्षे अध्यात्माचे मंथन करून निघालेले हे नवनीतच आहे.
परमपूज्य श्री समंतभद्र महाराजांच्या स्वपरहितकारी व्यक्तिमत्त्वाची व त्यांच्या लोकोत्तर कार्याची सर्व नव्या पिढीला ओळख व्हावी, त्यांच्या विचारांचे चिंतन करावे, त्यांच्या अलौकिक जीवनदृष्टीचे नव्या पिढीवर संस्कार व्हावेत. भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी जीवाचे रान करणाऱ्या आजच्या तरुण पिढीसाठी ‘अध्यात्म नवनीत’ ही एक उत्तम संजीवनी आहे. म्हणून ही पुस्तिका नव्यास्वरूपात पुनर्मुद्रित करीत आहोत.
स्व. श्रीपाल शिवलाल शहा यांचे चिरंजीव अतुल शहा, सौ. अनुराधा, चि. क्षितिश- सौ. सायली व कन्या सौ. अनघा यांच्या उदारदातृत्वामुळेच ही पुस्तिका प्रकाशित होत आहे.आम्ही सर्व कुटुंबीय त्यांचे अत्यंत आभारी आहोत. त्यांच्या या धर्ममय जीवनात उत्तरोत्तर असाच पुण्यसंचय होत राहो ही शुभकामना !
परमपूज्य श्री समंतभद्र महाराज खऱ्या अर्थाने एक युगप्रवर्तक महामानव होऊन गेले यात काही शंका नाही. आजच्या कलहप्रिय व भोगप्रधान समाजासमोर उदात्त व त्यागप्रधान मंगल जीवनाचा एक महान आदर्श त्यांनी उभा केला.
गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणाने लौकिक व धार्मिक शिक्षणाची सुंदर सांगड घालून त्याद्वारे तरुण पिढी आदर्श आचार-विचारांनी संपन्न घडविण्याचा त्यांचा अभिनव उपक्रम अतिशय उपयुक्त व अभिनंदनीय असाच होता. भारताच्या व समाजाच्या सद्य:स्थितीवर तोच एकमेव पर्याय असल्याचे जाणून शील-ज्ञान-प्रेम-व्यवस्था व सेवा या पंचसूत्रीवर आधारित गुरुकुल शिक्षणाचा प्रयोग प्रथम कारंजा येथे यशस्वी केला व नंतर या (कोल्हापूर) भागात येऊन इकडेही त्यांनी तो सफलतापूर्वक रुजू केला. हे त्यांचे इकडील समाजावर फार मोठे उपकारच झाले आहेत.
श्री क्षेत्र बाहुबलीच्या त्या वेळच्या वैराण डोंगरावर पाच-सहा विद्यार्थ्यांना घेऊन त्यांनी कार्यास आरंभ केला; परंतु झऱ्याचा उगम प्रथम लहान असला तरी पुढे जसा तो मोठा होत जातो, त्याप्रमाणे या कार्यास हळूहळू विशाल रूप येत गेले. बाहुबली गुरुकुलातून हजारो विद्यार्थी सुशिक्षित व सुसंस्कारित होऊन बाहेर पडले व ते पुढे डॉक्टर, इंजिनीअर, प्राध्यापक, वकील, जज्ज, कारखानदार, अधिकारी बनून आयुष्यात
यशस्वीपणे पुढे आले. शिक्षणाबरोबर त्यांच्यावर बालजीवनात झालेले सुसंस्कारच त्यांचे जीवनातील आगळेपण स्पष्ट करतात. महाराष्ट्र व कर्नाटकात मिळून अशा प्रकारच्या अकरा-बारा संस्था आज शिक्षणाबरोबर संस्काराचे कार्य करीत आहेत व त्याचा लाभ हजारो विद्यार्थ्यांना मिळत आहे. हे समाजाचे भाग्यच म्हणावे लागेल.
मुनिधर्माचे निर्दोष पालन करीत समाजही हळूहळू सुसंस्कृत व धर्माभिमुख करता येतो हे त्यांनी आपल्या उदाहरणाने दाखवून दिले आहे. त्यांच्या ठिकाणी खरी सामाजिक अनुकंपा होती. ‘धर्म हा धार्मिक लोकांशिवाय राहू शकत नाही - न धर्मो धार्मिकैर्विना’ हे सूत्र ध्यानात घेऊन त्यांनी या दिशेने अखेरपावेतो प्रयत्न केले. आज ह्या गुरुकुल संस्थाच त्यांची चिरंतन स्मारके बनली असल्यास नवल नाही. यासाठी त्यांनी अनेक चारित्रसंपन्न कार्यकर्ते तयार केले. धर्म समाजकार्यासाठी आपले सारे आयुष्य वेचणारा समर्थ शिष्यवर्ग मिळणे या काळात अतिशय कठीण आहे, परंतु त्यांच्या प्रयत्नाने तसा पात्र कार्यकर्त्यांचा संच त्यांना लाभला. महाराजांचे हे कार्य अलौकिक व चिरस्मरणीय असेच झाले आहे यात शंका नाही. यामुळेच एका मान्यवर विद्वानाने म्हटले आहे की, ‘पूज्य महाराज म्हणजे एक ‘पारसमणी’ असून त्यांच्या स्पर्शाने अनेकांची जीवने सुवर्णमय बनली आहेत. त्यांच्या जीवनाचा सुगंध आसमंतात दरवळत आहे.’
मुनी होण्यात महाराजांची नैसर्गिक भावनाच काम करीत होती. लौकिकाची किंवा प्रसिद्धीची त्यांना यत्किंचितही आकांक्षा नव्हती. दुसऱ्यावर प्रभाव पाडण्यासाठी त्यांनी कधी काही केले नाही. संसाराचे व आत्म्याचे यथार्थ स्वरूप कळल्याने कषायांची आपोआप मंदता होऊन ते अंतर्बाह्य निर्मल बनले. उठता-बसता, खाता-पिता, ॐ नमः सिद्धेभ्यः चा
अंतर्जल्प आतून सतत चालू असे. प्रायः मौनस्थ राहून तत्त्वचिंतनात ते अधिक काळ घालवीत. बाहुबली डोंगराच्या दक्षिणेकडील जुन्या गुफेत राहून तासन् तास ध्यानधारणा करीत. निर्लेप वृत्तीने जीवन जगण्याचा सतत प्रयत्न असे. समयसार गाथा ४१२ मध्ये आचार्य कुंदकुंदांनी सांगितल्याप्रमाणे मोक्षमार्गावर आत्म्याला स्थिर कर. त्याचेच ध्यान कर. त्याचाच अनुभव घे. त्यातच नित्य विहार कर. अन्य पदार्थसमूहामध्ये भटकू नकोस. या जिनाज्ञेचे पुरेपूर पालन करून आपले जीवन त्यांनी खऱ्या अर्थाने कृतार्थ केले व होईल तितके समाजालाही उन्नत करण्याचा प्रयत्न केला. समयसार, प्रवचनसार, समाधिशतक, इष्टोपदेश आदी अनेक अध्यात्मग्रंथांतील गाथा-श्लोक मुखोद्गत असल्याने उपदेश देताना अगर आशीर्वाद पाठविताना त्यांचा व अन्य अगणित सुभाषितांचा ते सुरेख उपयोग करीत.
गुणग्राहकता हा महाराजांचा वैशिष्ट्यपूर्ण स्वभाव होता. गुणिषु प्रमोदम् हे त्यांच्या अंतरंगात भिनले होते. दर्शनास आल्यावेळी परगुणपरमाणून् पर्वतीकृत्य नित्यं या वचनानुसार दुसऱ्यातील थोड्याही चांगल्या गुणांचे कौतुक करून त्यांना अधिक गुणविकास करण्यास – विशेषतः ज्ञानाभ्यास वाढविण्यास सतत प्रेरणा देत. अकृत्रिम प्रेमाचा वर्षाव करीत.
आचार व विचारात व्यवहार तथा निश्चयाचा सुंदर समन्वय असलेली, आयुष्यात व्यक्तिगत व सामाजिक उन्नतीचा सुंदर मेळ घालणारी आणि आत्मानुभूतीच्या महान संकल्पेनेची पुरेपूर बैठक असलेली अशी महाराजांसारखी व्यक्ती क्वचितच पाहाव्यास मिळते आणि म्हणूनच त्यांच्याबद्दल एवढेच म्हणावेसे वाटते की, ‘झाले बहु, होतील बहु, परंतु यासम हा!’
प्रस्तुत पुस्तिका म्हणजे जैन तत्त्वज्ञान आणि व्यवहार यासंबंधीची प्रश्नोत्तरे आहेत.
प्रस्तुत पुस्तकाचे पुनः प्रकाशन करण्यासाठी सन्मती प्रकाशन, बाहुबलीचे व श्री बाहुबली ब्रह्मचर्याश्रम व विद्यापीठ या उभय संस्थेचे संचालक मा. श्री. बी. टी. बेडगे गुरुजी यांनी अनुमती प्रदान केली, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.
या पुस्तकाच्या संशोधनास माझे बंधू प्रा. धनंजय शहा व भगिनी सन्मती शहा यांनी खूपच मदत केली.
कर्म-सिद्धान्त जैन दर्शनातील एक महत्त्वपूर्ण अंग आहे. जैसे ‘करावे तसे भरावे’ हाच या कर्म सिद्धांताचा, जैन तत्त्वज्ञानाचा मूलमंत्र आहे.
कर्म म्हणजे तन-मन-वचनाने केलेली कृती! आमचे चांगले किंवा वाईट जसे कर्म असेल तसा त्याचा चांगला किंवा वाईट परिणाम तर भोगावाच लागणार आहे. आपल्या कर्माचे फळ देणारा, अथवा त्यात काही कमी-जास्त करणारा कोणी नियंत्रक नाही. विस्तवावर पाय ठेवला तर भाजणारच! त्यासाठी कोणा तिसऱ्या नियंत्रकाची गरजच नाही. जसे कर्म तसे त्याचे फळ हेच सत्य आहे. हाच आहे कर्म सिद्धान्त, हाच आहे जैन दर्शनाचा मूळ आधार!
स्वतःला या कर्मापासून मुक्त करणे हाच मोक्ष!
एक तत्त्व म्हणून हे जाणून घेतले, मान्य केले तरी आपल्या दैनंदिन जीवनात खूप काही प्रश्न, मनात शंका येतातच. या प्रश्नांची उत्तरे पाहिजे असतात. ‘अध्यात्म नवनीत’ ही अशीच एक गुरू-गुरुशिष्यरूपाने झालेली चर्चा आहे. या चर्चेतून आपल्याही मनातील प्रश्नांची उत्तरे मिळतात, शंकांचे समाधान मिळते.
प्रश्न १ - मानवी जीवन मुख्यतः पुरुषार्थाधीन आहे की कर्माधीन? कारण जीवनात प्राप्त होणारी इष्टानिष्ट सामुग्री व त्यापासून मिळणारे सुख वा दुःख हे तर बहुंशी कर्माधीनच दिसते व माणसाची बुद्धीदेखील कर्मोदयानुरूप किंवा भवितव्यतेनुसार होते. ग्रंथातूनही म्हटले आहे. ‘कर्मायत्तं फलं पुसां, बुद्धिः कर्मानुसारिणी’ ... मग या चक्रातून सुटका कशी होणार?
उत्तर - जीवन सर्वस्वी कर्माधीन आहे असा एकान्त करणे चूक आहे. तसे मुळीच नाही. असे झाले असते तर कोणी कधी मुक्तीला गेलाच नसता. आत्मा अनंत शक्तिमान आहे. त्या शक्तीचा अभाव कालत्रयीही होत नाही.
जसे नदीच्या प्रवाहात सापडलेला मनुष्य प्रवाहाचा वेग तीव्र असला तर पाण्याबरोबरच वाहत जातो. त्यातून तीर गाठणे त्यास अतिशय अवघड होते; परंतु तोच वेग मंद झाल्यावर योग्य देशाने प्रयत्न केला तर तो नदीपार होऊ शकतो. तसेच मानवी जीवनाचे आहे. वर्तमानकाळी प्राप्त झालेली बुद्धी व इतर परिस्थिती पूर्व कर्मोदयानुसार कमी-अधिक असली तरी मानवी जीवनात तिचा योग्य उपयोग करून आपण आपल्या सुप्त शक्तीचा विकास करू शकतो. पुरुषार्थ हा तर सर्वस्वी आत्माधीनच आहे, नव्हे आत्मशक्तीलाच ‘पुरुषार्थ’ म्हणतात.
‘सूतो वा सूतपुत्रो वा, यो वा को वा भवाम्यहम् ।
दैवायत्तं कुले जन्म, मदायत्तं तु पौरुषम् ॥’
प्रश्न २ - पण योग्य वेळी योग्य पुरुषार्थ करण्याची बुद्धी माणसाला होत नाही किंवा प्रसंगी विपरीत देखील होते, याचे कारण तरी कर्मच ना? ‘बुद्धिः कर्मानुसारिणी’ असे जे म्हटले आहे ते का?
उत्तर - एकेन्द्रियापासून असंज्ञी पंचेन्द्रिय जीवांपर्यंत मन नसल्याने त्यांना तर विचार करण्याची शक्तीच नाही... मानवातही ही स्थिती काही प्रमाणात आढळते. तथापि ज्ञानावरणादि कर्माच्या तर-तम क्षयोपशमानुसार तो आपल्या हित-अहिताचा विचार व निर्णय अधिक समर्थपणे करू शकतो... ‘विवेक’ हाच त्याचा सर्वत्र मार्गदर्शक ‘चक्षू’ असला पाहिजे.
प्रश्न ३ – परंतु दैनंदिन व्यवहारात असा अनेकदा अनुभव येतो की, इष्ट वस्तूच्या प्राप्तीसाठी किंवा अनिष्ट परिहारासाठी विवेकपूर्वक योग्य नि पुष्कळसा प्रयत्न करूनही इच्छेप्रमाणे घडून येतेच असे नाही. उलट जसजसा अधिक प्रयत्न करावा, तसतसे नको तेच नेमके घडून येते. सारे प्रयत्न विफल होतात, याचे कारण काय? प्रतिकूल दैवच म्हणावे तर मग पुरुषार्थाला जीवनात स्थान कुठे राहिले?
उत्तर – पुरुषार्थाचे स्थान जीवनात आहे तिथेच आहे आणि ते निश्चित आहे किंबहुना पुरुषार्थ हेच खरे जीवन, बाकीचे मरणच. तथापि कोणत्याही कार्यासाठी अनेक कारणांचा मिलाप पाहिजे असतो. केवळ एकाच कारणाने कार्य होत नाही. लाभान्तरायादी* किंवा असाता कर्माच्या तीव्र उदयात पुरुषार्थ करूनही इष्टसिद्धी लवकर होत नाही. तथापि ती होईपर्यंत माणसाने धीर ठेवला पाहिजे, निराश होता कामा नये. त्याने हे ध्यानात घ्यावे की, योग्य दिशेने केलेला पुरुषार्थ केव्हाही व्यर्थ जात नसतो. आपणास तत्काल यशलाभ दिसला नाही तरी विरोधी कर्माची शक्ती कमी होण्यास त्याचा उपयोग झालेला असतो.
प्रश्न ४ – उद्योग, चिकाटीचे प्रयत्न किंवा अखंड धडपड म्हणजेच पुरुषार्थ ना? मग तो दैव प्रतिकूल असताना प्रत्यक्ष फुकटच – व्यर्थ गेलेला दिसतो. अशा स्थितीत तो केव्हाही व्यर्थ जात नाही असे कसे म्हणता येईल?
* लाभ मिळण्यापासून दूर करणारे कर्म (obstacle)
उत्तर – तुम्ही समजता तो पुरुषार्थाचा वास्तविक अर्थ नव्हे. पुरुषार्थ म्हणजे अंतरंग परिणामांची निर्मलता, भावनांची विशुद्धी. बाकीच्या उद्योगास – बाह्य प्रवृत्तीस तत्त्वतः पुरुषार्थ म्हणता येत नाही. ते तर देहादिकांचे कार्य होते. लौकिक व्यवहारात त्याला ‘पुरुषार्थ’ नाव दिले जात असले तरी आत्म्याचा त्या त्या वेळचा परिणाम हाच खरा पुरुषार्थ. तो समीचीन असणे हीच त्याची निर्मलता. अशा निर्मलतेमुळे प्रतिबंधक कर्म (प्रतिकूल दैव) क्रमाने आपोआप शिथिल होते व कार्यसिद्धी सुकर होते. ती होईपर्यंत बाह्य उद्योग प्रसंगी फुकट गेल्यासारखे वाटले तरी वरील अंतरंग विशुद्धीचा समीचीन पुरुषार्थ व्यर्थ कसा जाईल? तो आपले काम केव्हाही करणारच.
प्रश्न ५ – ज्यावेळी इच्छित कार्य सफल होत नाही त्यावेळी मनाला त्यासंबंधीचीच चिंता अधिकाधिक वाटत राहते. दुसरे काही सुचत नाही, अशावेळी काय करावे?
उत्तर – परिणामांची (भावनांची) उच्चता नि उज्ज्वलता ठेवून योग्य दिशेने प्रयत्न चालू ठेवावेत. त्यात प्रमाद करू नये किंवा हतोत्साही बनू नये. केवळ चिंता अगर नैराश्य यामुळे परिस्थिती थोडीच सुधारणार? उलट त्यायोगे पापबंध होऊन ती अधिकच बिघडणार मात्र! प्रतिकूल परिस्थितीत आकुलता, हळहळ किंवा उद्वेगरूप परिणाम होणे हे असमंजसपणाचे द्योतक आहे. मनाची उतावीळता व अक्षमताच त्यातून व्यक्त होते. बाह्य परिस्थिती आपल्या इच्छेप्रमाणे किंवा आकुलतेने झटपट बदलणारी वस्तू थोडीच आहे? तशी कल्पना उराशी बाळगणे हाच मोठा भ्रम होय. अशावेळी व्यर्थ चिंता किंवा दुःख करणारे बहुधा याच भ्रमाने पछाडलेले असतात.
प्रश्न ६ – मग अशावेळी कोणता विचार असणे उचित आहे?
उत्तर – आचार्यकल्प पं. आशाधरजींनी ‘सागारधर्मामृत’ ग्रंथातून अशाप्रसंगी केलेले मार्गदर्शन लक्षात घेण्यासारखे आहे. ते म्हणतात –
निष्फलेऽल्पफलेऽनर्थफले जातेऽपि पौरुषे ।
न विषोदेन्नान्यथा वा हृष्येल्लीला हि सा विधेः ॥
(अध्याय ६, श्लोक १६)
अर्थात इष्ट प्राप्तीसाठी केला जाणारा पुरुषार्थ प्रसंगी निष्फळ ठरला, अल्पफलदायी झाला किंवा विपरीत फळाला जन्म देणारा दिसून आला तरी विवेकी पुरुषाने त्यासंबंधी विषाद मानू नये, दुःख करू नये. उलट कदाचित् तो अपेक्षेहून अधिक फलदायी ठरला तर हर्षाने हुरळूनही जाऊ नये. कारण ही एक प्रकारे दैवची लीला असते. दैवच्या अनुकूलतेत थोडाही पुरुषार्थ विपुल फल देतो. आणि प्रतिकूलतेच्या फेऱ्यात विपुल पुरुषार्थही निष्फळ अगर अल्प फलदायी ठरतो. अशा स्थितीत आपले प्रयत्न लवकर सफल होत नाहीत म्हणून उतावीळपणा, दुःख अगर आकुलता न करता धीराने व विवेकाने वागणे, काही चुकले असल्यास त्यासंबंधी आत्मनिरीक्षण करून चुका सुधारणे, यशलाभ होईपर्यंत तत्त्वश्रद्धा कायम ठेवून धैर्याने व समाधानाने प्राप्त परिस्थितीला तोंड देत राहणे हाच समजंसपणा होय. अशानेच प्रतिकूल स्थिती देखील हळूहळू अनुकूल बनत जाते.
प्रश्न ७ – प्राप्त परिस्थितीत समाधान मानण्यात पुरुषार्थ कसा?
उत्तर – परिणामांची उच्चता, उज्ज्वलता, समाधानवृत्ती हाच खरा पुरुषार्थ असल्याचे यापूर्वी सांगितलेच आहे. तशी वृत्ती नसणे हे पुरुषार्थहीनतेचे द्योतक होय. आत्म्याच्या दुर्बलतेचीच ती निशाणी. दुर्बल व अविवेकी आत्माच प्रतिकूलतेच्या लहान मोठ्या हेलकाव्याने आकुलित व दुःखी होत असतो.
प्रश्न ८ – एकंदर बाह्य धडपड उपयोगी नाही तर?
उत्तर – वरील तत्त्व ध्यानात घेऊन विवेकपूर्वक आपण जे जे करू ते ते सर्व उपयोगीच आहे. अज्ञानाने इष्टप्राप्तीसाठी केवळ धावधूप करण्याने काय साध्य होणार? केवळ क्लेश, दुःख नि पश्चात्ताप एवढेच पदरी यायचे.
प्रश्न ९ – प्रतिकूल परिस्थितीतही धैर्य व समाधान वृत्ती ठेवणे सर्वांना कसे शक्य आहे?
उत्तर – सर्वांना शक्य नसले तरी विचारशील व तत्त्वाभ्यासी माणसांना यात दुर्घट काय आहे? वस्तुस्वरूपाचे ज्ञान व त्यावरील दृढ श्रद्धा यांमुळे अंतरंग चित्तवृत्तीत इष्ट बदल झाल्याशिवाय राहत नाही आणि एकदा तो झाला म्हणजे बाह्य परिस्थितीचे आघात सहन करण्याची ताकद त्यांच्यात आपोआप निर्माण होते. कसल्याही विरोधी स्थितीत त्यांच्या मनाची शान्ती व समाधानवृत्ती ढळत नाही.
प्रश्न १० – याचा अर्थ ‘त्यांना परिस्थितीजन्य वेदना होत नाहीत’ असा समजावा काय?
उत्तर – ‘वेद्ना’ याचा अर्थ आकुलता – दुःख करीत असाल तर त्या होत नाहीत. जाणीव कदाचित होईल. तथापि तत्त्वज्ञानाच्या साहाय्याने मानसिक खेद वा विषाद ते करीत नाहीत. ज्ञानाचे हेच सामर्थ्य आहे. त्याची कसोटीही अशाच वेळी होते. विपत्ती ह्याच ज्ञानी माणसाच्या तत्त्वनिष्ठेचा ‘निकष ग्राव’ (कसोटीचा दगड) मानल्या गेल्या आहेत. ‘तत्त्वनिकषग्रावा तु तेषां विपत्!’ आणि अशा संकटसमयीच विज्ञ पुरुषार्थीचे ज्ञान–सामर्थ्य जागृत होते असे आचार्य वादीभसिंह सूरींनी म्हटले आहे. ‘तत्त्वज्ञानं हि जागर्ति विदुषां आर्तिसंभवे ।’
प्रश्न ११ – प्रस्तुत नीतिवचनाचा संदर्भ कोणता आहे?
उत्तर – याचा संदर्भ असा की, भोगासक्तीमुळे राजा सत्यंधराचे राज्यकारभाराकडील झालेले दुर्लक्ष हेरून त्याचा फायदा घ्यावा व वेळीच आपल्या मार्गातील त्याचा काटा काढून आपण सत्ताधीश बनावे या राक्षसी महत्त्वाकांक्षेने प्रेरित झालेला दुष्ट काष्ठंगार – ज्याला राजानेच लहानाचा मोठा करून क्रमाने प्रधानपदी नियुक्त केले होते – जेव्हा राजवाड्यावर अकस्मात सैन्य पाठवितो. त्यावेळी द्वारपालाकडून वार्ता कळताच राजा सत्यंधराचे क्षात्रतेज उफाळते, तो संग्रामासाठी एकाकी सिद्ध होतो. इतक्यात महाराणी विजया अर्धासनावरून खाली पडून मूर्च्छित झालेली पाहताच तो परततो व अशाही मनःस्थितीत तिला धीर देत तत्त्वोपदेशाचे दोन शब्द सांगतो. स्वतःच्या प्राणनाशासारख्या संकटसमयी देखील हे मनोधैर्य टिकणं व तत्त्वविचार जागृत राहणे विवेकशीलतेचे द्योतक नव्हे काय? ज्ञानी एवं विचारवंतांचे हेच कर्त्तव्य होय.
प्रश्न १२ – अशा कसोटीत उतरणे ही काही साधी गोष्ट नाही. यासाठी आगळे आत्मसामर्थ्य हवे. ते सामान्यांना कसे प्राप्त होणार?
उत्तर – वस्तुस्वरूपाच्या सतत चिंतन व मननाने असे सामर्थ्य प्रगट होणे कठीण नाही. वस्तु विचारत ध्यावते मन पावे विश्राम । वस्तूच्या मूळ स्वरूपाच्या चिंतनाने मन शांत आणि धीरोदात्त बनते. ‘मेरी भावना’ यातही पं. जुगलकिशोर मुख्तारांनी म्हटले आहे – ‘वस्तुस्वरूप विचार खुशीसे, सब दुख संकट सहा करे॥’ आपण ही भावना मुखाने रोज म्हणतो, पण त्या भावनेची मनावर सतत पुटामागून पुटे चढवीत नाही. ती चढवीत राहिले पाहिजे तरच आत्मबल वाढते. कधीतरी आणि भावाकडे अर्थाकडे लक्ष न देता केवळ मुखपाठ म्हणून काय उपयोग? एकाच समीचीन तत्त्वाचा पुनःपुन्हा विचार, ते तत्त्व जीवनात उतरविण्यास उपयोगी ठरतो. सामर्थ्य प्रदान करतो. ‘असो द्यावा धीर, सदा समाधान’ यातूनही हेच तत्त्व समजून घ्यावयाचे आहे.
प्रश्न १३ – वस्तुस्वरूपाचा विचार करताना आमचे मन - वचन - काय यांच्या दैनंदिन क्रियांमध्ये कर्मोदय व पुरुषार्थ यांचे नेहमी मिश्रणच पाहाव्यास मिळते. त्यात कर्मोदयाने होणारे कार्य कोणते व पुरुषार्थाने होणारे कोणते यासंबंधी काही अधिक खुलासा कळाला तर बरे होईल.
उत्तर – कोणतेही कार्य केवळ एका कारणाने घडत नाही, त्यात उपादान कारण एक व निमित्त कारणे अनेक असतात. हा सिद्धान्त प्रथम ध्यानात घेतला पाहिजे. या सिद्धान्तानुसार पुद्गलस्वरूप मन–वचन–काय यांच्या क्रियेत आत्म्याचा योग व उपयोग ही प्रामुख्याने निमित्त असतात हे काहीशा सूक्ष्म विचारांती दिसून येईल. योगाचे द्रव्ययोग व भावयोग असे दोन भेद आहेत. मन–वचन–कायेच्या निमित्ताने आत्मप्रदेशांचे परिस्पंदन होणे हा ‘द्रव्ययोग’ व त्याचे निमित्त घेऊन नवीन कर्म–नोकर्मवर्गणांना ग्रहण करणारा जीवाचा शक्तिविशेष हा ‘भावयोग’ होय. ‘उपयोग’ हा आत्म्याचा चैतन्यानुविधायी परिणाम अर्थात दर्शन–ज्ञानरूप प्रवृत्ती. अशा रीतीने योग आणि उपयोग यांच्या सहयोगाने कार्य घडते. यापैकी योग व तन्निमित्तक क्रिया प्रामुख्याने कर्माधीन असल्या तरी आपली ‘उपयोग – प्रवृत्ती’ ही मात्र सर्वस्वी स्वाधीन आहे व तोच आत्म्याचा ‘पुरुषार्थ’ होय. कर्मोदयानसार नेहमी उपयोग प्रवृत्ती झालीच पाहिजे असे नाही. समजा ‘क्रोध’ कर्माचा उदयकाल आला तर आत्मा त्यामुळे क्रोधी बनेलच असे नाही. तो ज्ञानी असेल, तत्त्व–विचारात आपला उपयोग लावील तर त्यास क्रोध येणार नाही, त्याचा कर्मोदय विफल बनेल. असेच अन्य कषायभावांचे – विकारांचे समजावे. अशावेळी केवळ जड कर्मोदय काय करणार?
समजा, आपण मंदिरात गेलो व मूर्तीचे दर्शन घेतले. ती मूर्ती स्वतःहून आपल्या ठिकाणी शुभभाव निर्माण करील काय? आपण आपल्या
ज्ञानबलाने जर तिचा उपयोग भक्तिभाव निर्माण करण्याकडे करून घेतला तरच ती आपल्या शुभ परिणामाला निमित्तभूत झाली असे म्हणता येईल. त्याच मूर्तीकडे पाहून एखाद्याचा अरुचिभाव किंवा द्वेषभाव जागृत झाला तर त्याच्या अशुभ परिणामाला ती निमित्त ठरेल. यावरून हा शुभ किंवा अशुभ भाव त्या मूर्तीमुळे झाला असे कोणी म्हटले तर ते कितपत खरे आहे? कर्मोदयाबाबतही असेच समजावे. कारण तेही स्वभावतः जडच (पुद्गलस्वरूप) आहे. ते काही स्वतःहून आपल्यावर शुभाशुभ भाव करण्याची जबरदस्ती करीत नाही. आपण अज्ञानपणाने स्वयं विकारी होऊन कर्मोदयानुकूल परिणाम केले तरच ते (कर्मोदय) निमित्त ठरतात; या उलट ज्ञानभाव जागृत ठेवून आपल्या मूळ स्वरूपाचा विचार केला तर ते विफल होतात, जबरीने विकार निर्माण करू शकत नाहीत. कर्मोदय आणि आत्मपरिणाम ही दोन भिन्न द्रव्ये आहेत व एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याच्या परिणमनात स्वयं काही करू शकत नाही, झालेच तर केवळ निमित्त होऊ शकते. हा अध्यात्मशास्त्रातील महत्त्वाचा सिद्धान्त या बाबतीत ध्यानात घेणे जरूर आहे.
प्रश्न १४ – आपल्या उपलब्ध ज्ञानादी शक्तींचा उपयोग ‘स्व’ स्वरूपाचे चिंतन–मननादी इष्ट कार्याकडे लागणे किंवा करता येणे हे तरी तत्कालीन कर्मोदयजन्य परिस्थितीवरच अवलंबून राहील ना?
उत्तर – नाही. ते सर्वस्वी आपल्या स्वाधीन आहे. आपण तसा प्रयत्न करीत नाही हा आपला दोष आहे, केला तर त्यात कर्मोदय आड येत नाही. उलट तो अधिकाधिक निर्बल व विफल होऊन निघून जातो. असे झाले नसते तर कोणताही जीव कधी मुक्तीला गेलाच नसता. कर्मोदयाला बलहीन व फलहीन करण्याचे अमोघ सामर्थ्य आत्म्याच्या ठिकाणी आहे. म्हणूनच तो ‘स्वोपयोगी’ (स्व–उन्मुख) बनून अनंत कर्माची क्षणात निर्जरा करू शकतो व अखेर संसारसागरातून मुक्त होऊ शकतो.
अज्ञानी जीव आपल्या प्राप्त शक्तींचा अपव्यय करून जीवन फुकट घालवितो. परद्रव्याची इच्छा (आसक्ती) रोखण्याकडे व स्वरूप–चिंतनाकडे त्यांचा उपयोग लावीत नाही. त्यामुळे कल्याणस्वरूप निराकुलता (मुक्तिसुख) त्यास समजूही शकत नाही. मग त्याची प्राप्ती तर दूरच. पंडितप्रवर दौलतरामजींनी आपल्या ‘छहढाला’ ग्रंथात हेच सांगितले आहे.
‘रोके न चाह निज शक्ति खोय,
शिवरूप निराकुलता न जोय ।’
वास्तविक खरे सुख निराकुलतेतच आहे, किंबहुना निराकुलता हेच आत्म्याचे खरे सुख होय. परद्रव्याच्या इच्छेत आकुलताच आकुलता वाट्याला येते व ती कधी संपत नाही. हेच दुःख होय. म्हणून विवेकी–ज्ञानी पुरुष आपल्या शक्तींचा उपयोग सदैव संसारिक इच्छा रोखण्याकडे करीत राहतो.
प्रश्न १५ – तीव्र अशुभ कर्मोदयात व त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या सर्वथा प्रतिकूल परिस्थितीत जेव्हा आत्मबल फिके पडते तेव्हा काय करावे?
उत्तर – तत्त्वज्ञानाची कास धरून त्याच्या चिंतन–मननाने आत्मबल वाढवीत राहावे. ज्ञानाच्या सतत संस्काराशिवाय ते कसे वाढणार? ज्ञानी जीवांना कोणतीही स्थिती नेहमी अनुकूलच वाटत असते. विरोधी वा प्रतिकूल परिस्थितीचाही उपयोग आपल्या आत्मबलाच्या संवर्धनासाठी कसा करून घ्यावा हे त्यांना चांगले अवगत असते. कोणत्याही द्रव्य–क्षेत्र–कालादिकांचा चांगला अगर वाईट उपयोग करून घेणे हे अखेर कुणाच्या हाती असणार? आपल्याच ना? मग अशुभ कर्माचा तीव्र उदय आपले काय करणार आहे? विरुद्ध परिस्थितीतूनही चांगले घेण्याची दृष्टी तयार झाली पाहिजे हे महत्त्वाचे आहे.
"All things are in their own places. Mind makes hell
of heaven and heaven of hell."
‘सर्व वस्तू आपापल्या जागीच असतात. मनुष्याचे मनच स्वर्गाचा नरक व नरकाचा स्वर्ग बनवीत असते.’ शेक्सपिअरच्या या वचनात देखील किती रहस्य भरलेले आहे!
सारांश, बाह्य परिस्थितीला अनुकूल किंवा प्रतिकूल मानणे हे सर्वस्वी आपल्याच दृष्टीवर अवलंबून आहे. तसेच प्रतिकूल वाटणाऱ्या स्थितीतही आपण धैर्य व शांती ठेवून आपले परिणाम बिघडू न दिले तर सर्व काही अनुकूलच अनुकूल आहे. ती प्रतिकूलताही आपले काहीच वाईट करू शकणार नाही. उलट आपल्या शांत व निश्चल परिणामामुळे
अशुभ कर्माचा जोर संपून विरोधी स्थितीही हळूहळू अनुकूल बनत जाईल व आत्मबल देखील वृद्धिंगत होईल.
वर्तमान स्थितीत सुद्धा आपणास मिळालेल्या विषयादी सामुग्रीसंबंधी समाधान न मिळालेल्या सामुग्रीसंबंधी अतृष्णा आणि अनिष्ट विषयासंबंधी अनुद्वेग (मध्यस्थता), त्याचबरोबर सतत न्याय प्रवृत्ती, अहिंसादी धर्मरूप परिणाम असणे हाच खरा पुरुषार्थ होय. त्यायोगे आपले वर्तमानातही चांगलेच होते व भविष्यात तर होतेच होते. कारण ‘ज्याचा वर्तमानकाळ चांगला आहे त्याचा भविष्यकाळही चांगलाच असतो.’ हा निसर्ग नियम आहे. याउलट ज्याचा वर्तमानकाळ वाईट त्याचा भविष्यकाळही वाईट हे निश्चित समजावे. भविष्याची उभारणी नेहमी वर्तमानावरच आधारलेली नाही काय?
तेव्हा आपले चांगले अगर वाईट होणे बाह्य परिस्थितीवर अवलंबून नसून अंतरंग परिणामावरच अवलंबून आहे हे निश्चित समजावे.
देश - काल - खलाः किं तैश्चला धीरेव बाधिका ।
अवहितोऽत्र धर्मे स्यादवधानं हि मुक्तये ॥
‘देश, काल अगर दुर्जन पुरुष हे आपले काय बिघडवितात? त्यांच्या निमित्ताने चलायमान (विकृत) झालेली बुद्धीच आपणास खरी बाधक होते. म्हणून तिला विकृत न होऊ देता धर्मामध्ये सदैव सावधान ठेवले पाहिजे. अशी सावधानताच मुक्तीला कारण होते. यासाठी लागणारा समीचीन पुरुषार्थ प्रत्येकास करता येण्यासारखा असून तोच खात्रीने तारक आहे.
प्रश्न १६ – न्याय, नीती व धर्माला अनुसरून वागण्याने वर्तमान स्थितीत तर काहीच बदल झालेला दिसून येत नाही; उलट तसे वागणाऱ्यांवर प्रसंगी अधिकाधिक आपत्ती मात्र आलेल्या आढळतात. त्यांची गरिबी वा दरिद्रता टळत नाही, सन्मानाऐवजी त्यांना पदोपदी अवमान सहन करावा लागतो. समाधानाऐवजी त्रास नी मनस्ताप तेवढा पदरी येतो. याउलट न्याय–अन्यायाची, नीती–अनीतीची चाड न बाळगता वाटेल त्या मार्गाने प्राप्त संधीचा फायदा घेणारा मात्र आज जगात सुखी व वैभवसंपन्न दिसतो, लोकांत त्याचीच सत्ता व मान्यता आढळते. अंगी विशेष गुण नसतानाही जेथे तेथे तो नेता म्हणून मिरवतो, त्यालाच मानाची पहिली खुर्ची मिळते. कोणत्याही आपत्तीतून तो सहीसलामत पार पडताना दिसतो. असे का व्हावे? (ii) न्यायनिष्ठ व धर्मनिष्ठ माणसाला व्यवहारात योग्य थाराही मिळू नये, प्राप्त विरोधी स्थितीशी झुंजत राहण्यातच त्याचे संपूर्ण आयुष्य खर्ची पडावे आणि धर्महीन, नीतिभ्रष्ट व असदाचारी माणसाला मात्र याचि देही याचि डोळा धन–मान–ऐश्वर्य – नि अधिकार सारे यथेच्छ भोगण्यास मिळावे हे आश्चर्य नव्हे काय? निसर्गाचा असाच नियम आहे की काय?
उत्तर – ही आपली समजूत अजिबात चुकीची आहे. धर्म किंवा नीतीचे फल विपत्ती, दुःख आणि अधर्म व अनीतीचे फल संपत्ती, सुख ही गोष्ट त्रिकालीही शक्य नाही. निसर्ग असा असूच शकत नाही. वरवर पाहणाऱ्याला व्यवहारात तसे दिसत असले तरी वस्तुस्थिती तशी नाही. जसे एखाद्याने धंदा केला व त्यात त्याला काहीसा नफाही झाला, तथापि पूर्वीचा तोटा जर बराच मोठा असेल तर हा नफा होऊनही एकंदरीत तो तोट्यातच
आहे ना? हजार रुपये मिळाले; परंतु अगोदरचा तोटा दहा हजारांचा असला तर शेवटी वजाबाकी होऊन जमाखर्चात तोटाच दिसेल. परंतु हा तोटा त्याने केलेल्या नव्या धंद्याचे फल म्हणता येईल काय? अर्थात नाही. तसेच तुम्ही म्हणता त्या बाबतीतही समजावे.
न्याय व नीतीचे फल निसर्गनियमानुसार ‘पुण्यबंध’ हेच आहे व ते सदैव सुखदच असणार; परंतु या अगर पूर्वजन्मांतील संचित पापांचे अधिक प्राबल्य असेल व त्याचा उदयही बलवान असेल तर नव्या पुण्यबंधाचा उदयकाल येईपर्यंत पूर्व पापाचे फल माणसाला भोगावे लागणार हे निश्चित. तसा निसर्गनियम आहे. अशा स्थितीत धर्म व न्याय्य आचरण करूनही आपत्ती दूर होत नसल्या, दरिद्रता टळत नसली तर ते धर्माचे फल नसून पूर्वीच्या अधर्मजन्य तीव्र पापाचे फल समजले पाहिजे व त्याचा जोर कमी होईपर्यंत धैर्य व शांती ठेवली पाहिजे. कारण अधीरता किंवा आकुलता यामुळे पुनः नवीन पापबंध होऊन फलता दुःख नी आपत्तीमध्ये भरच पडणार हे निश्चित.
तसेच अन्याय व अनितीने वागणारा वर्तमानकाळी जरी सुखी व वैभवसंपन्न दिसत असला तरी ते सुख वा वैभव अधर्माचे फल न समजता पूर्वपुण्याचे समजले पाहिजे. त्याच्या सध्याच्या अनीतिमय आचरणाने ते पुण्य एकदम जरी सरत नसले तरी त्याची फलदान–शक्ती बऱ्याच अंशाने कमी होते व क्रमाने त्याचे पतन होत एखाद्या दिवशी तो रसातळाला पोहोचतो. पुण्यपापाची ही बेरीज–वजाबाकी प्रतिक्षणी आपल्या आचार–विचारानुसार निसर्गतःच होत असते. ती वरवर पाहणाऱ्या स्थूल दृष्टीला दिसू शकत नसेल तर तो त्या दृष्टीचा दोष म्हणावा लागेल. वस्तुस्थितीत त्यामुळे फरक पडत नाही.
प्रश्न १७ – माणसाला धर्मप्रवृत्त करण्यासाठी ही एक प्रकारे मनाची समजुती करणे आहे असे वाटते.
उत्तर – तसे बिलकूल नाही. हे यथार्थ तत्त्व आहे. निसर्गाचा नियम आहे हा. जसे एखादे हिरवेगार झाड फुलाफळांनी समृद्ध आहे, पण त्याच्या मुळास कीड लागली असली तर काही दिवस ते हिरवे व फळांनी लबलबलेले दिसत असूनही आतून ते हळूहळू पोखरले जात असते. पुढे एक दिवस असा येतो की वाऱ्याच्या झोतासरशी ते कोलमडून पडते. मानवी जीवनाचेही असेच समजावे. पूर्व पुण्याने आज एखाद्याचे जीवन ऐश्वर्यसंपन्न व सुखी दिसत असले तरी अनितीची – कुभावांची कीड त्यास लागून भविष्यात ते नष्टभ्रष्ट झाल्याशिवाय राहत नाही. अधर्म–अनिटी ही सुखाला कारणीभूत होईल हे कसे शक्य आहे? अधर्माचे फल पापच असणार. कदाचित पुण्य प्रकर्षात काही काळ ते जाणवणार नाही इतकेच. भर्तृहरीने म्हटले आहे –
नाधर्मश्चरितो लोके सद्यः फलति गौरिव ।
शनैरावर्तमानस्तु कर्तुर्मूलानि कृन्तति ॥
– अधर्माचरण लोकांत गाईसारखे तत्काल फल देत नाही हे खरे; तथापि ते पुनःपुन्हा आचरले गेले तर करणाऱ्याची पाळेमुळे खणून काढते हे मात्र निश्चित.
प्रश्न १८ – मागचे कर्मफल या भवात व यावेळचे पुढील भवात मिळेल असे समजून मनुष्याने एकंदरीत धर्ममार्ग सोडू नये व पुढील सुखाच्या आशेने वर्तमान दुःखाला – आपत्तीला नेहमी तोंड देत राहावे असाच ना याचा अर्थ?
उत्तर – नाही. हा काही पोकळ आशावाद नव्हे. आपल्या नेहमीच्या चांगल्या – वाईट आचार–विचारांचे फल वर्तमानकाळीच मिळते हा महत्त्वाचा सिद्धान्त या विवेचनातून लक्षात घ्यावयाचा आहे. दृश्य फल मिळण्यास कदाचित अवधी लागेल; परंतु शान्ती – अशान्ती, आनंद किंवा आकुलतारूप परिणाम व तज्जन्य पुण्य किंवा पापबंधरूप अदृश्य फल तर त्याच क्षणी प्राप्त होते. त्यास अवधी कशाचा? त्यासाठी प्रतीक्षा करण्याची जरुरी नाही. ते तत्काल पदरात पडणारे फल होय, एवढंच नव्हे तर पुढील दृश्य नि प्रत्यक्ष अनुभवास येणाऱ्या सुख–दुःखरूप फलाचे तेच जनक आहे. क्षणा–क्षणातील सुविचार–कुविचारामुळे संचित होत जाणारे पुण्य अगर पापच मनुष्याला सुस्थिती किंवा दुःस्थितीच्या दिशेने नेत असते. कोणतीही स्थिती अकस्मात् (कारणाशिवाय) घडत नाही. म्हणून केवळ पुढे जन्मांतरी सुख मिळेल या आशेने नव्हे तर आताच वर्तमान काळात ते निश्चितपणे प्राप्त होते या तात्त्विक श्रद्धेने मनुष्याने नीती व धर्माची कास धरली पाहिजे. कसल्याही विरुद्ध स्थितीत ही श्रद्धा त्याने विचलित होऊ देता कामा नये. उलट येणारी संकटे व आपत्ती धर्माचरणासंबंधीच्या आपल्या श्रद्धेची, दृढतेची जणू कसोटीच पाहण्यासाठी आल्या आहेत असे समजून प्रसन्नतेने त्यांचे त्याने स्वागत केले पाहिजे. धैर्याने व शांतीने त्यावर विजय मिळविला पाहिजे. अशा आपत्तींचे मूळ कारण जे असातादि अशुभ कर्म त्याची वेगाने निर्जरा होण्याचा हाच एकमेव मार्ग आहे हे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे. अशुभ कर्माचे निष्कासन झाल्याशिवाय बाह्य स्थितीत सुधारणा होणे शक्य नसते. मग ही गोष्ट अनिती व अधर्माचरणाने साध्य होईल की नीती व धर्माचरणाने, याचा आपणच विचार करावा.
प्रश्न १९ – पण धर्माने व नीतीने वागणाऱ्यास बहुधा अखेरपर्यंत कष्टाचेच जीवन जगावे लागते त्याचे काय ?
उत्तर – ‘कष्ट’ तर केव्हाही आपल्या मानण्यावर अवलंबून आहे. साधू पुरुष तपश्चरण करीत असता त्यात कष्ट मानतात काय ? जर मानतील तर संक्लेश परिणाम होऊन त्यायोगे पापबंधच करून घेतील. एखाद्या विशिष्ट ध्येयाने प्रेरित होऊन आपण एखादे आवडते काम करू लागलो, तर ते करीत असता कितीही त्रास वा कष्ट सोसावे लागले तर आपण ते आनंदाने सहन करतो, उत्साह वाढताच ठेवतो मग ते काम धन मिळविण्याचे असो, अगर लोकसेवेचे असो. सत्याग्रही लाठीमार किंवा बंदुकीच्या गोळ्याही छातीवर झेलतो. त्यावेळी बाह्यतः त्याला वेदना होत असल्या तरी अंतरंगातून कर्तव्यपूर्तीचा अपूर्व आनंद व समाधान त्यांच्या सात्त्विक चेहऱ्यावर झळकतेच ना ? तीच भूमिका नीतिमान व धर्मनिष्ठ माणसाची असते. त्यास जीवन जगताना कितीही कष्ट उपसावे लागले तरी त्याचा उत्साह ओसरत नाही, आनंद कमी होत नाही. उलट तीच आपल्या कसोटीची वेळ समजून तो सन्मार्गावर अधिकच दृढ होतो.
प्रश्न २० – अशावेळी त्याचे विचार कोणत्या तऱ्हेचे असतात ?
उत्तर – तो बाह्य जड संपत्तीला संपत्ती मानीत नाही. अंतरंग आत्मवैभवालाच खरी संपत्ती समजतो. पाप–निरोधात प्रत्यक्ष धनलाभापेक्षाही त्यास समाधान असते. ‘पापनिरोध’ हीच खरी टिकाऊ संपत्ती व ‘पापास्रव’ हीच मोठी विपत्ती. अशी त्याची दृढ समजूत असते. स्वामी समन्तभद्राचार्यांचे रत्नकरण्ड श्रावकाचारातील पुढील वचन सदैव तो नजरेसमोर ठेवतो –
‘यदि पापनिरोधोऽन्यत्सम्पदा किं प्रयोजनम् ।
अथ पापास्रवोऽस्त्यन्यत्सम्पदा किं प्रयोजनम् ॥’
– जर माझा न्याय्य व धर्म आचरणाने पापकर्माचा निरोध होत असेल, जुने पाप धुवून जात असेल व नवीन येत नसेल तर तो निरोधच माझ्या भावी उत्कर्षाला व सुस्थितीला कारण होणार असल्याने अन्य जड संपत्ती प्रत्यक्षात प्राप्त झाली किंवा न झाली तरी त्यामुळे माझे काय नफा – नुकसान होणार आहे? ‘पापनिरोध’ हीच एवढी मोठी नि मूल्यवान संपत्ती आहे की ती पुढे इतर सारे तुच्छ व अप्रयोजनभूत आहे.
– आणि या उलट अनीती व अधर्माचरणाने अखंड ‘पापास्रव’ होत असेल तर बाह्य संपत्ती प्राप्त होऊनही तिचा काय उपयोग? पापोदयात एक तर ती टिकून राहायची नाही व कदाचित राहिलीच तरी आपल्या मानसिक सुख–शान्तीला ती कारण न ठरता दुःख व आकुलतेलाच कारण ठरेल. वरून वैभवाचा डोलारा व कृत्रिम सुखाचा आभास दिसला तरी आतून भीती, संशय, अविश्वास व असमाधान ह्याच गोष्टी पदरात यायच्या. असा विचार विवेकी पुरुष करीत असतो. पापमूलक अन्याय व अनीतीपेक्षा नीतिमार्गाने जाऊन येणाऱ्या विपत्ती व कष्टांना तो अधिक पसंत करतो त्यात त्याला अधिक शान्ती नि समाधान वाटते.
प्रश्न २१ – ही तत्त्वदृष्टी आमच्यासारख्या सामान्य लोकांना कशी प्राप्त व्हावी? त्यासाठी कोणता मार्ग आहे?
उत्तर – धर्मग्रंथांचा स्वाध्याय व त्यातील मौलिक तत्त्वांचे नित्य चिंतन यामुळे ही दृष्टी सहज प्राप्त होण्यासारखी आहे. त्यात अवघड असे काय आहे? तत्त्वचिंतनाने परिणामांची अधिकाधिक निर्मलता होऊन नैतिक व आध्यात्मिक जीवनावरील आपली निष्ठा वाढण्यास अतिशय मदत होते व जसजशी ही निर्मलता आणि निष्ठा वाढते, तसतसे आत्मबल विकसित होऊन प्रतिकूल परिस्थितीतही धैर्य व शान्ती राहू शकते, आकुलता कमी होते, तत्त्वदृष्टी व ज्ञान जागृत होऊन परिणामात दृढता येते. अशाप्रकारे स्व–स्वरूपामध्ये रुची, दृढता व स्थिरता येणे हेच खरे सुख होय. यातूनच जीवनातील अननुभूत आगळा आनंद चाखावयास मिळतो.
प्रश्न २२ – एकूण प्रतिकूल परिस्थितीत देखील जीवन सुखी व आनंदमय राहू शकते तर !
उत्तर – तत्त्वज्ञान जागृत असेल, त्याचा अवलंब घेण्याची मनाला सवय असेल तर का राहू शकणार नाही ? अवश्य राहिलेच पाहिजे. क्षत्रचूडामणीमध्ये आचार्यांनी म्हटले आहे –
‘दुःखार्थोऽपि सुखार्थो हि तत्त्वज्ञानधने सति ।’
– तत्त्वज्ञानाचे भांडवल जवळ असले तर इतरांना दुःखदायक वाटणारा पदार्थदेखील आपणास सुखदायक नि हितकारक वाटतो. या ग्रंथात वर्णिलेला श्रीदत्त श्रेष्ठीवरचा दुर्धर प्रसंग आपणास आठवत असेल. व्यापारात महत्प्रयासाने मिळविलेले धन ज्या बोटीतून ते घेऊन येत होते, ती बोट एकाएकी सोसाट्याचा वारा सुटून समुद्रातील लाटांच्या तडाख्यात बुडाली व सारे धन नष्ट झाले. एका तरंगत्या ओंडक्याच्या साहाय्याने ते कसेबसे किनारी पोहोचले. अशा स्थितीत आपले मनोधैर्य थोडेही विचलित न होऊ देता प्राप्त संकट आपल्या चांगल्यासाठीच आले आहे असे मानून विवेक व समयसूचकतेने त्यावर मात केली. प्रथमानुयोगात अशी शेकडो उदाहरणे पाहाव्यास मिळतात.
व्यवहारात देखील पदोपदी असा अनुभव येतो की घरातील स्त्री, पुत्र बंधुगण किंवा स्वकीय आप्त, विरोधी अगर विपरीत प्रवृत्तीचे असल्यास सामान्य मनुष्य त्यामुळे अतिशय मनस्ताप करून घेतो, क्रोधाने संतप्त होतो, प्रसंगी वैतागून आपल्याच जीवाला काही कमी अधिक करून घेण्याचा आततायीपणा दाखवितो; परंतु तत्त्वज्ञ मात्र असे काहीच करीत नाही. विवेक व शान्तीने तो प्रथम त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, समजूत न पटल्यास स्वतः क्रोध अगर वैताग न करता यात आपलीच
परीक्षा आहे, क्षमा व शान्तीचा एरवी न मिळू शकणारा पाठ यातून आपणास मिळेल अशा विचाराने त्यांच्या त्या प्रतिकूल प्रवृत्तीतूनही चांगलाच अर्थ काढतो व आनंद लुटतो. खेदखिन्न होत नाही. सामान्य – अज्ञ व तत्त्वज्ञ माणसात हाच मोठा फरक आहे. पहिला संकटास भितो, तर दुसरा ते आव्हान समजून निर्भयतेने त्यापुढे उभा ठाकतो. पहिला त्यास पाहताच घाबरतो तर दुसरा त्याचे आनंद व उत्साहाने स्वागत करतो. त्याला ही खात्री असते की विपत्ती ह्या वास्तविक वाईट नाहीत व आपले तर त्या काहीच वाईट करू शकत नाहीत. उलट त्या आल्या तर आपण जागे होतो, त्यांचा मुकाबला करण्याचे धैर्य–साहस अंगी येते, मनोबल वाढते. हा आपला फायदा की तोटा ?
जुन्या मराठी वाचन–पाठमालेत एक कथापाठ असल्याचे आपणास आठवत असेल. ‘विपदः सन्तु वो नित्यम्।’ कुंतीला श्रीकृष्णाने प्रसन्न होऊन ‘वर’ मागण्यास सांगितले. तेव्हा कुंती म्हणाली, ‘भगवन्, वरच देणार असाल तर मला नित्य आपत्ती द्या, म्हणजे तुमच्या नावाचे मला कधी विस्मरण होणार नाही. सुखात विस्मरण होण्याची संभावना असते.’ यावरून तत्त्वजागृती व जीवन विकासासाठी आपत्ती ह्या उपकारकच होतात हेच नाही का सिद्ध होत ?
हिंदी कवींनी देखील म्हटले आहे –
दुःखमें सुमिरन सब करैं, सुखमें करै न कोय ।
जो सुखमें सुमिरन करै, तो दुःख कहाँसे होय ॥
सुख के माथे शिल परो, जो नहि नाम सुहाय ।
बलिहारी इस दुःखकी, जो पलपल नाम रटाय ॥
ज्ञानी मनुष्य प्राप्त विपत्तींनाही आत्महितासाठी राबवितो हीच त्याची खरी विशेषता होय आणि हीच खरी जीवन कला आहे.
प्रश्न २३ – आपल्या या विवेचनावरून एक नवी दृष्टी, नवा पाठ मिळाला की, ‘विपत्ती ह्या जीवनात केवळ उपकारकच नाहीत तर ध्येयजागृतीसाठी त्या आवश्यकही आहेत. असेच ना?’
उत्तर – यात काय संशय ? जीवन जर सर्व बाजूंनी उन्नत व विकसित व्हावे असे वाटत असेल तर ते विपत्तींच्या आंचे तून तावून–सलाखून निघणे आवश्यकच आहे. सुवर्ण जसे अग्नीतून तापुन निघाल्याशिवाय शुद्ध होत नाही, तसेच मानवी जीवनदेखील प्राप्त विपत्तींशी विवेकपूर्वक धैर्याने झगडल्याशिवाय विकसित होत नाही, विपत्ती ह्या जीवनातील विविध बाजू अंगोपांग उजळून स्वच्छ करीत असतात. आपल्यातील गुणदोषांची खरी परीक्षा विपत्तींतच होते. विरुद्ध परिस्थितीतही आपले मन स्थिर व शांत राहते काय ? तत्त्वनिष्ठा नि धैर्य अविचल टिकून राहतो काय ? विवेक जागृत राहतो काय ? या किंवा अशा अन्य कसोटीवरूनच मनुष्याची एकंदर पारख केली जाते, त्याची श्रेष्ठता–कनिष्ठता कळून येते. त्याची आध्यात्मिक उंची, त्यातील तरतमता मोजता येते.
जगात जे जे श्रेष्ठ व आदर्श पुरुष होऊन गेले, त्या सर्वांचे जीवन आपण अभ्यासले तर ते हेच दाखविते की कितीही संकटे आली, स्वजन किंवा इतरेंजनांकडून कितीही त्रास वा छळ झाला तरी त्यांनी आपली चित्तशांती व तत्त्वनिष्ठा यत्किंचितही ढळू दिली नाही, धैर्य व विवेक थोडाही वितळू दिला नाही. उलट आलेल्या आपत्तींचा आपल्या आत्मिक उत्थानासाठीच उपयोग करून घेतला. शूर नि वीर वृत्तीने त्याशी झुंजून अखेर त्यावर मात केली व जीवन कृतार्थ केले. महापुरुषांची जीवनचरित्रे अशा ऐतिहासिक व संस्मरणीय घटनांनी भरलेली असतात; म्हणूनच ते लोकवंद्य व पूज्य होतात. एकाहून एक महान आपत्तीच्या अग्निदिव्यातून त्यांच्या
ध्येयवादी जीवनाची व तत्त्वनिष्ठ दृष्टीची कठोर परीक्षा झालेली असते आणि त्या प्रत्येक परीक्षेतून ते पूर्ण यश घेऊन उत्तीर्ण झालेले पाहाव्यास मिळतात. त्यांचा मोठेपणा मुख्यतः अशाच गोष्टीवर आधारलेला असतो. संकटांना व दुःखांना ते आपत्तीरूप मानीतच नाहीत. 'What man thinks of difficulties and calamities, they are the blessings in the opinion of God' असे एका इंग्रजी ग्रंथकाराने म्हटले आहे, ते या संदर्भात त्यांना अर्थपूर्ण वाटते. संकटाकडे पाहण्याचा हा एक उच्च व उत्साहदायी दृष्टिकोन आहे. सामान्य मानवी दृष्टीला वाटणारी संकटे व दुःखे विशाल व थोर अंतःकरणाच्या दृष्टिसंपन्न पुरुषाला एकप्रकारचे वरदानच वाटते. आपल्या सत्त्वपरीक्षेसाठी व त्याद्वारे संचित पापक्षालनासाठीसाठीच ती आली आहेत असे समजून तो त्यांचे हसतमुखाने स्वागत करतो, आनंदाने सहन करतो. त्यामुळे खरोखरच पूर्व दुष्कर्माचे वेगाने क्षालन होऊन त्याचा आत्मा स्वच्छ व परिशुद्ध होतो, हृदय पवित्र बनते, मनोबल वाढते, विचार उन्नत होतात आणि एकंदरीत त्याचे जीवन–पुष्प पुलकित, विकसित नि टवटवीत होण्यास मदत होते.
तत्त्वज्ञानाचे वास्तविक फल हेच आहे. ते एक प्रकारचे जीवनरसायन आहे. त्याच्या नित्य सेवनाने कोणत्याही प्रतिकूल स्थितीत मन सन्मार्गावर दृढ राहू शकते व जीवन निरामय एवं निराकुल बनू शकते. जे ज्ञान नेमक्या संकटकाली क्षीण पावते ते खरे ज्ञानच नव्हे.
प्रश्न २४ – असे कसे म्हणता येईल? दुःखाची तीव्रता अत्यधिक असेल तर केवळ ज्ञानाचे सामर्थ्य कोठवर पुरेसे पडणार ?
उत्तर – ही आपली समजूत कोती आहे. वस्तुस्वरूपाच्या समीचीन ज्ञानाचे सामर्थ्य वास्तविक अगाध आहे. जे ज्ञान संसाराची वज्रबंधने तोडण्यास समर्थ आहे. ते संसारातील सामान्य संकटांपुढे हरून जाईल हे कसे शक्य आहे?
तथापि कित्येकदा ऐन संकट–प्रसंगी ते पंगू बनताना दिसते याचे कारण त्या ज्ञानावर दुःखाच्या अभ्यासाचे–परीषहजयाचे पुरेसे संस्कार झालेले नसतात. जीवनात विविध दुःखाचे लहान–मोठे आघात ज्याने सहन केलेले असतात, त्याचे ज्ञान कोणत्याही संकटाच्या काळात निश्चित टिकाव धरू शकते.
अदुःखभावितं ज्ञानं क्षीयते दुःखसन्निधौ ।
तस्माद् यथाबलं दुःखैरात्मानं भावयेन्मुनिः ॥
– दुःखाचे संस्कार नसलेले ज्ञान दुःख येताच क्षीण पावते, असून नसल्यासारखे होते. म्हणून मुनिजनांनी यथाशक्ती आत्म्यावर दुःखाचे–परीषहांचे संस्कार घडविले पाहिजे, असे जे आचार्य पूज्यपादांनी ‘समाधिशतक’ ग्रंथात म्हटले आहे, त्यात फार मोठे रहस्य आहे. ज्ञान हे दुःखांनी भावित अर्थात् संस्कारित असावे लागते, तपाची–परीषहजयाची पुटे त्यावर चढावी लागतात.
वैद्यकशास्त्रात एखादे रसायन तयार करावयाचे झाल्यास त्यासाठी आवश्यक पदार्थांच्या मिश्रणावर विशिष्ट रसाची पुटांवर पुटे द्यावी लागतात. शेकडो–हजारो वेळा ते मिश्रण विशिष्ट रसात खलून वाळवावे लागते. कित्येक महिने व वर्षे ही प्रक्रिया चालू असते. यालाच त्या शास्त्रात ‘भावना’
हे नाव आहे. अशा भावना त्या मिश्रणावर जितक्या अधिक दिलेल्या असतील, तितके ते रसायन विशेष गुणकारी मानले जाते. सहस्त्रपुटी भस्मे, हेमगर्भादी मात्रा, शंखादी वटी आदी आयुर्वेदीय औषधे अशाच पद्धतीने तयार केली जातात. जीवनात ज्ञानाचेही रसायन असेच इष्ट फलदायी करावयाचे असल्यास त्यावर विविध दुःखांच्या व परिषहांच्या ‘भावना’ होणे अवश्य आहे. अशा भावना (संस्कार) ज्या ज्ञानावर पुरेशा नसतील, ते ज्ञान दुःख अगर संकटसमोर उभे दिसले की बावरते, गोंधळते. अग्नीच्या संपर्काने मेण वितळावे त्याप्रमाणे दुःख जवळ येताच ते वितळते, क्षीर्ण पावते.
म्हणूनच साधकाने कष्ट नि परीषह सहन करण्याची सवय ठेवली पाहिजे असे आचार्य सांगतात आणि याच दृष्टीने जीवनात येणाऱ्या आपत्ती ह्या आत्मविकासाला पोषक नि आवश्यक असतात. त्यामुळे आपले नुकसान होण्याऐवजी फायदाच अधिक होतो. आपल्या आत्मोत्थानाला मोठीच मदत होते असे असले पाहिजे.
प्रश्न २५ – ही दृष्टी आम्हासारख्या सामान्य माणसांना प्राप्त होणे कठीण वाटते. येणाऱ्या आपत्ती दूर करण्याऐवजी त्या आत्मविकासासाठी पोषक म्हणून मुद्दाम पुनः नव्या ओढून घेणे हे व्यवहारात कोण मान्य करील ?
उत्तर – आपत्ती मुद्दाम ओढून घेऊ नका, पण निसर्गतः त्या आल्याच तर पाहताक्षणी मनुष्याने निदान गांगरून तरी जाव्यास नको ना? त्यासाठी तरी मन खंबीर पाहिजेच ना? अज्ञानाने ज्या गोष्टी आपणास आपत्तीरूप व अनिष्ट वाटतात, त्या वास्तविक आपत्ती नसून अपेक्षाकृत संपत्तीच आहेत. अहितकारी नसून हितकारी आहेत, अशी अंतर्शातून निदान श्रद्धा तरी तयार होणे जरुरीचे नाही काय? त्याशिवाय त्यांना सामोरे जाण्यास मन खंबीर कसे बनणार ? आपली श्रद्धाच विपरीत असते, म्हणून तर मनुष्य संकटे पाहून घाबरतो, भयभीत होतो. ही श्रद्धा समीचीन बनविणे हेच अध्यात्माचे मुख्य उद्दिष्ट आहे व ती तशी बनल्याशिवाय व्यवहारातही सुख लाभणे अशक्य आहे. व्यवहारी जीवन देखील सुखी व्हावे असे वाटत असेल तर ही तत्त्वदृष्टी प्रत्येकाने प्राप्त केलीच पाहिजे. ती कठीण म्हणून टाळून कसे चालेल?
प्रश्न २६ – मग अध्यात्मशास्त्रात ‘विपत्ती’ ही वस्तूच नाही का ? व्यवहारातील साऱ्याच विपत्ती ह्या जर अपेक्षाकृत संपत्तीच मानायच्या तर मग विपत्ती राहिल्याच कोणत्या?
उत्तर – अध्यात्मशास्त्रात ‘परभाव’ किंवा ‘विभावपरिणती’ हीच खरी विपत्ती मानली आहे. परपदार्थ माझे इष्ट किंवा अनिष्ट करतात, तेच सुख अगर दुःख देतात, त्यांच्या प्राप्तीत–संयोगात माझा उत्कर्ष आहे व वियोगात किंवा अप्राप्तीत अपकर्ष आहे अशा प्रकारची मिथ्या मान्यता–श्रद्धा हीच आपल्या संसारदुःखाची जननी असल्यामुळे अध्यात्म तिलाच साक्षात विपत्तीरूप समजते– अशी मिथ्या श्रद्धा हाच ‘परभाव’ होय आणि परालाच इष्ट (हितकर) किंवा अनिष्ट (अहितकर) मानून त्यात अनुराग वा विद्वेष ठेवणे हीच ‘विभाव परिणती’ होय. संसार व त्यातील साऱ्या आपत्तींचे मूळ या दोन गोष्टीतच आहे. म्हणून ते नाहीसे करण्यावर अध्यात्माचा सारा भर आहे. या दृष्टीने ‘स्वभाव’ आणि ‘वीतराग परिणती’ हीच आत्म्याची खरी नि शाश्वत संपत्ती समजली पाहिजे. व्यवहारातील संयोग–वियोगरूप संपत्ती–विपत्तीच्या कल्पना ह्या आपेषिक अत एव क्षणिक असल्याने तत्त्वतः त्या काल्पनिक व भ्रामकच आहेत. अध्यात्मात त्यांना केवळ ‘वासनांचे विलास’ म्हटले आहे.
वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनाम् ।
तथा ह्युद्वेजयन्त्येते भोगा रोगा इवापदि ॥
अर्थ – देहधारी–संसारी जीवांचे इन्द्रियजन्य सुख व दुःख केवळ वासनाजन्य अर्थात कल्पणारम्य आहे. तो एक अज्ञानजन्य भ्रम आहे. कारण हे विषयभोग संकटकाली रोगाप्रमाणे जीवाला उद्वेग व मनस्ताप देणारे असतात. त्यायोगे तृप्ती, समाधान व खरी शान्ती कधीही मिळत नाही.
प्रश्न २७ – हे कसे काय ? प्रत्यक्ष जीवनात रोज अनुभवास येणारी सुख–दुःखे केवळ काल्पनिक किंवा वासनात्मक कशी म्हणता येतील ? ती तर प्रत्यक्षात आनंद किंवा आकुलता निर्माण करताना दिसतात.
उत्तर – हेच चांगले समजून घेणे प्रथम आवश्यक आहे. याचा नीट उलगडा झाला तरच आपला अनादीकालीन भ्रम दूर होईल व तत्त्वदृष्टी जागृत होईल. आपण आपली सुख–दुःखे नेहमी बाह्य पदार्थांवर अवलंबून ठेवतो. जणू तेच सुख वा दुःख देतात असे मानतो. वास्तविक बाह्य पदार्थ सुखीही देत नाहीत व दुःखीही देत नाहीत. आपण आपल्याच कल्पनेने काहींना इष्ट व काहींना अनिष्ट मानून त्यांच्या संयोग–वियोगात आनंद वा आकुलता करीत राहतो. बाह्य पदार्थ स्वयं इष्टही नाहीत व अनिष्टही नाहीत. ते आपण ज्यावेळी जसे पाहू त्यावेळी तसे दिसतात. जो पदार्थ एकाला इष्ट वाटतो तोच दुसऱ्याला त्याचवेळी अनिष्ट वाटतो. समुद्राचे अति खारट पाणी चुकून आपल्या तोंडात गेले तर लागलीच थू–थू करीत आपण ते बाहेर फेकतो ; पण मासे त्यातच मजेने राहतात. अकाली जोरात पाऊस आला तर उभ्या पिकाची नासाडी झालेली पाहून शेतकरी चिंतातुर होतो आणि व्यापारी
धान्यभाव भडकतील या कल्पनेने आनंदित होतो. एवढेच नाही तर एकच वस्तू प्रथम आपणास इष्ट वाटत असलेली कारणपरत्वे दुसऱ्या क्षणी अनिष्ट वाटू लागते. सदैव इष्ट वाटणारा पैसा रानावनातून जात असता जीवावर प्रसंग गुदरला तर नकोसाही वाटू लागतो किंवा मुलगाच उधळा व दुर्वर्तनी निघाला तर तो असूनही दुःख नि पश्चात्ताप करण्याची पाळी येते.
यावरून इष्टानिष्टता हा पदार्थगत धर्म नसून आपल्या रुचीप्रमाणे आपण ज्या त्यावेळी पदार्थांवर ती केवळ आरोपित करीत असतो हेच सिद्ध होते आणि अशा आरोपित कल्पनेवरच आपल्या साऱ्या ऐहिक सुख–दुःखांची इमारत उभी असते. म्हणूनच आचार्य पूज्यपादांनी त्यांना केवळ ‘कल्पनांचे खेळ किंवा वासनांचे विलास’ म्हटले आहे आणि स्पष्टीकरणास पंचेंद्रियांच्या भोग्य विषयांचा समर्पक दृष्टांतही दिला आहे, की ‘जगात नेहमी सुखोत्पत्तीला कारणीभूत समजले जाणारे सुंदर स्त्री–पुत्र, घर–दार, बागबगीचे इत्यादी पदार्थ मनाची सुस्थिती आहे तोवर आनंददायी वाटतात, पण तेच आपत्काळी चित्त अस्वस्थ झाले की रोगाप्रमाणे तापदायी नि उद्वेगजनक भासू लागतात.’
बाह्य पदार्थातून सुख शोधणाऱ्यांची नेहमी हीच गत होते. त्यांना समाधान व शांती कधीच मिळत नाही. कारण बाह्य पदार्थाचा संयोग–वियोग हा काही आपल्या इच्छेवर सर्वस्वी अवलंबून नसतो. त्याला अन्य अनेक गोष्टी कारणीभूत असतात. त्या साऱ्याच आपल्या आधीन असत नाहीत. ‘पर–परिणमन नही निज–आश्रित, यह तह अतिअकुलावे।’ असे जे भागचंद कवींनी म्हटले आहे त्यात फार मोठा आशय आहे. सुख बाहेर– परपदार्थात शोधण्याची सवय आणि तशी विपरीत मान्यता हीच आपल्या अनन्त दुःख नि आकुलतेचे मूळ कारण होय. शांती नि सुखाचे स्थान वास्तविक आपला ‘आत्मा’च आहे; तेथे सुखाचा शोध केला तरच ते मिळायचे. जेथे ज्याची जागाच नाही तेथून ते कसे मिळणार ?
बाह्य पदार्थ जर सुख देणारे असते तर तीर्थंकर–चक्रवर्तींसारख्या अपार ऐश्वर्य आणि सर्व प्रकारच्या अभ्युदयांनी संपन्न असणाऱ्या महापुरुषांनी आपल्या साऱ्या वैभवादिकांचा त्याग करून अखेर मुनिदीक्षा कशाला घेतली असती ? त्यांच्या ऐश्वर्यात–भौतिक सुखसामुग्रीत कोणती कमतरता होती ? सर्वोत्कृष्ट सारे ऐश्वर्य, सारे वैभव त्यांच्या पायाशी लोळण घेत होते. असे असतानाही त्यांनी ते निःसार समजून त्यावर लाथ मारली व शाश्वत सुखनिधान अशा आत्मवैभवाकडे सारे लक्ष केंद्रित केले, त्याच्या प्राप्तीत आनंद व धन्यता मानली, शक्तिसर्वस्व पणाला लावून त्याची साधना केली. यावरून हेच दिसून येते की, सुख ‘पराश्रित’ नसून ‘स्वाश्रित’ आहे. ‘पदार्थाधीन’ नसून पूर्णतया ‘स्वाधीन’ आहे. ते केव्हाही अंतरंगातच शोधले पाहिजे. बाहेर शोधणे हा भ्रम आहे, व्यर्थ कालापव्यय आहे.
प्रश्न २८ – खरे आहे आपले म्हणणे! आम्ही सुखाची बाहेरून अपेक्षा करतो आणि त्यामुळे पदरी निराशेशिवाय दुसरे काहीच पडत नाही आमच्या. या विषयाची ही सुंदर उकल आता बरीच लक्षात आली ; तथापि सांसारिक सुख–दुःखांना आपण ‘आपेक्षिक’ म्हटले ते कसे ?
उत्तर – मनुष्य आपल्याजवळ जे आहे, त्यात कधीच संतुष्ट नसतो. तो नेहमी दुसऱ्याच्या सुखाकडे पाहून ते आपणास मिळत नाही म्हणून सदा असंतुष्ट व दुःखी असतो आणि यामुळे होते काय, तर प्रत्येकास ‘मीच दुसऱ्यांहून अधिक दुःखी आहे असे वाटत राहते. दुसऱ्यांच्या सुखाच्या तुलनेत आपले प्राप्त सुख व संपत्ती त्याला नगण्य वाटते. ती तो मोजणीतच घेत नाही. मात्र जे कमी आहे अगर नाहीच, त्याकडे आशाळभूतपणे सतत
दृष्टी लावून बसतो. दुसऱ्यांकडे ते असलेले पाहून मनात झुरतो, प्रसंगी त्यांचा द्वेष–मत्सर करू लागतो.
विद्वद्रत्न पं. देवकीनंदनजी म्हणत असत, ‘मनुष्य को अपने पास जो नहीं है, उसका जितना दुःख होता है, उससे कई गुना अधिक दुःख वह दूसरोंके पास है इसका होता है।’ व्यवहारात नेहमी आपणास हेच दिसते. आपल्याकडील प्रत्यक्ष अभावापेक्षा दुसऱ्याकडील त्या पदार्थाच्या सद्भावामुळे आपणास त्या अभावाची तुलनेने अधिक जाणीव होते व आपण अधिक आकुलित होतो. परस्परांतील धनादिकांची स्पर्धा, ईर्ष्या अशा जाणिवेतूनच जन्म पावतात. कितीही मिळाले तरी तृप्ती होत नाही, समाधान वाटत नाही. ‘आपल्याहून हा अधिक सुखी, तो अधिक सुखी’ अशीच कल्पना हा जीव रात्रंदिवस करीत राहतो आणि अशा रीतीने दुसऱ्याचे अधिक सुख हेच याच्या मानसिक दुःखाचे नि अशान्तीचे मूळ बनते. संसारात अशा बाह्य तरतमतेला का कधी अंत असतो?
प्रश्न २९ – मग हा अंत कुठे नि कसा करायचा ?
उत्तर – ज्ञानानेच आपल्या इच्छेला व वासनेला बांध घालून व परिग्रहाचे प्रमाण करून तो केला पाहिजे, तरच सुखाची–शान्तीची काही आशा आहे. ‘आपल्याहून दुसरा अधिक सुखी’ ही दृष्टी सोडून ‘मी इतरांहून किती सुखी आहे ? माझ्याहून अधिक दुःखी जीव जगात कितीतरी आहेत, त्यांच्या दुःखाच्या तुलनेत माझे दुःख काहीच नव्हे’ ही दृष्टी अंगीकारली पाहिजे. वास्तविक चतुर्गतिरूप या विशाल विश्वात आपले कसले दुःख नि कसल्या आपत्ती ? याहून कितीतरी पटीने अधिक दुःखी असलेले अनंतानंत जीव या विश्वात आहेत. त्यांची दैन्यावस्था व अगणित दुःखे पाहिली म्हणजे त्यापुढे आपले दुःख अत्यल्प ठरेल, इतके ते थोडे असल्याचे आढळून येईल.पण मनुष्य नेहमी उलटच पाहतो. तो इतरांच्या तुलनेत आपली दुःखेच मोजीत बसतो, सुख मात्र कधी मोजीत नाही. त्यामुळे त्यास डोळ्यांपुढे नेहमी दुःखाचेच डोंगर दिसत राहतात, सुख काही दिसत नाही. साहजिकच तो अधिकाधिक अस्वस्थ नि आकुलित होतो.विशेषतः आपत्तीच्या काळात तर बहुधा असे घडते आणि त्यामुळे त्याच्या मनात एक प्रकारचा न्यूनगंड तयार होतो. स्वतःसंबंधी अकारण अविश्वास व घृणा वाटू लागते. ‘माझे कसे होईल’ या भीतीने त्याच्या जीवनातील उत्साहच नष्ट होतो. वास्तविक अशावेळी त्याने आपल्याहून अधिक विपद्ग्रस्तांकडू पाहिले पाहिजे. त्यांच्या स्थितीशी तुलना करून त्यांच्याहून कोणती अनुकूलता आपणास प्राप्त आहे याचा विचार केला पाहिजे. ‘काय मनुष्यजन्म आपणास मिळाला नाही? प्राप्त इन्द्रिये कार्यक्षम नाहीत? शरीर इतरांहून निरोगी नाही? उच्च कुल व ज्ञानप्राप्तीसाठी विशेष अनुकूलता सहजासहजी मिळालेली नाही? बुद्धीचा विकास इतरांच्या तुलनेने अधिक झालेला नाही?’ ह्या व अशा अनेक चांगल्या बाबी आपल्या वाट्यास जर मिळाल्या आहेत तर त्यांची योग्य किंमत पारखता आली पाहिजे आणि ती कळाली तर निश्चितच प्राप्त दुःखापेक्षा सुखाची, प्रतिकूलतेपेक्षा अनुकूल साधनांची बेरीज अधिक होईल व आंतरिक समाधानास फार मोठी जागा असल्याचे दिसून येईल.या विषयानुरोधाने श्री. साने गुरुजींच्या ‘श्यामची आई’ या पुस्तकात एक सुंदर कथा असलेली आपणास आठवत असेल. मोठी उद्बोधक आहे ती!
प्रश्न ३० – कोणती कथा ? सांगाल तर बरे होईल.
उत्तर – मग ऐका तर.
एक भिकारी भुकेने अतिपीडित होऊन देवद्वाराजवळ काहीतरी मिळेल या हेतूने सकाळचा येऊन बसला होता ; परंतु दुपार संपून सूर्य कलतीला लागला तरी त्याच्या पात्रात चार दाणे पडले नाहीत की हातावर कोणी रुपयाही ठेवला नाही. त्याचा जीव कासावीस होऊ लागला. कालच्यासारखी आजची रात्रही अन्नाविनाच काढावी लागणार या विचाराने त्याचे माथे भडकले व आतापर्यंत मोठ्या भक्तीने देवाचा धावा करीत असलेले त्याचे तोंड देवाची मर्जी दिसत नाहीसे पाहून त्याच्याच नावाने शिव्यांची लाखोली वाहू लागले. मोठमोठ्याने शेलक्या शिव्यांचा देवावर वर्षाव करीत व यथेच्छ तोंडसुख घेत तो रस्त्यावरून जाऊ लागला. राजकर्मचाऱ्यांनी त्याचा तो एकंदर अवतार पाहून व त्याजकडून ग्रामदैवताचा होत असलेला उद्धार ऐकून त्याला ताबडतोब ताब्यात घेतले व राजापुढे उभे केले.
राजाने त्याची देवाविरुद्ध असलेली सारी फिर्याद ऐकून घेतली व तो दोन दिवसांचा भुकेला पाहून सेवकास अगोदर त्यास भोजन देण्यास फर्माविले. क्षुधा शांत झाल्यावर राजाने जवळ बोलावून त्याला विचारले, ‘‘का रे बाबा, अजून काही तुझी देवाविरुद्ध तक्रार आहे का? तू त्यास इतकी नावे ठेवतोस तेव्हा तुझी आणखी कोणकोणती दुःखे आहेत? ती सारी ऐकू दे तरी एकदा!’’
भिकाऱ्याला वाटले, ‘‘आपल्या लाखोलीने देव आज बराच टाळ्यावर आलेला दिसतो. तेव्हा आता सांगून टाकावी आपली सारी दुःखे!’’ आणि राजापुढे त्याने आपल्या उणिवांचा एकामागून एक पाढा वाचण्यास सुरुवात केली.
‘राजन्’! तो म्हणाला, ‘‘माझ्यासारखा दुःखी तुझ्या राज्यात नव्हे जगात कोणी नसेल! एक की दोन, किती म्हणून सांगू माझी दुःखे? ना घर,
ना दार, ना स्त्री, ना पुत्र! ना शेत, ना पैसा! जागा मिळेल तिथं बसावं, लोक देतील ते खावं, बोलतील ते ऐकावं व झिडकारलं–लाथाडलं तरी पुनः लाचारीनं त्यांचेच पाय धरावेत! दारी तासन् तास उभं राहावं. ऊन म्हणू नये, पाऊस म्हणू नये, असं माझं एकंदरीत जिणं! त्यात मी कोणतं म्हणून माझं दुःख पुढं करू? अन् अशा स्थितीत देवाला नाव न ठेवू तर काय करू?
राजा सारे शांतपणे ऐकत होता. त्याची ही दुःखकथा सांगून झाल्यावर राजाने पुनः विचारले, ‘‘अरे, एखादं–दुसरं सुखही तर दिलं असेल तुला देवानं? ते तर सांगतच नाहीस!’
‘नाही महाराज! माझ्या तरी वाट्याला एकही सुख आलेलं दिसत नाही. सारी दुःखच–दुःख आहेत!’ भिकारी म्हणाला.
त्यावर राजाला हसू आले. तो म्हणाला, ‘‘हे पहा, तुझे दोन्ही डोळे शाबूत आहेत ना?’’
‘‘होय महाराज!’’
‘‘मग असं कर. त्यातला एक डोळा मला दे. गेल्या वर्षभराच्या आजारात माझे दोन्ही डोळे गेले आहेत. तेव्हा तू तुझ्यापैकी एक जरी मला दिलास तरी मी तुझा फार आभारी होईन. त्यासाठी काय मागशील ती किंमत देण्यास मी तयार आहे. बोल, काय देशील?
भिकारी विचारात पडला. राजाचा प्रश्न व मागणी त्यास अगदीच अनपेक्षित होती; तथापि त्यास वाटले, ‘आपला एक डोळा देऊन जर जन्माचे आपले दारिद्र्य दूर होत असेल तर काय हरकत आहे हा सौदा करायला?’
आणि त्याने एका डोळ्याचे दहा हजार सुवर्ण दीनार मागितले.
राजा म्हणाला, ‘‘पहा, पुनः एकदा नीट विचार करून सांग! मगाहून तक्रार ऐकणार नाही. बाब डोळ्याची आहे!’’
भिकारी विचार करू लागला, ‘खरंच! एका डोळ्याची किंमत दहा हजार दीनार म्हणजे फारच कमी होते. निदान वीस तरी खरे!’
‘राजन्’ तो म्हणाला, ‘‘पंचवीस हजार दीनार द्या म्हणजे मी माझा डावा डोळा देतो.’’
‘‘आणि उजवा हवा असेल तर?’’
‘‘त्यास दुप्पट पडतील.’’
‘‘आणि दोन्ही घेतले तर?’’
‘‘पुरे एक लाख मोजावे लागतील.’’ भिकारी मागणीप्रमाणे किंमत वाढवीत होता.
राजा म्हणाला, ‘‘पुनः एकदा नीट विचार कर! दोन्ही डोळे मी मागत आहे. कान नाही, हात अगर पायही नाही. डोळ्यांचा हा सौदा आहे. तेव्हा नीट विचार करून बोल.’’
भिकारी पुनः विचारात पडला. सर्व इंद्रियात डोळ्याचे महत्त्व सर्वात अधिक असताना आपण त्याचे फक्त एक लाखच दीनार मागतो, हे काही ठीक नाही. दोन डोळ्यांचे दोन लाख तर हिशेबानेच होतात. शिवाय डोळे गेल्यावर काम करता येणार नाही, घरीच बसून राहावे लागेल. तेव्हा कमीत कमी तीन लाख तरी हवेच! त्याने आपला मनोदय राजास प्रगट केला.
राजा हसून म्हणाला, ‘‘तीनच काय मागतोस? तीस लाखही मी देण्यास तयार आहे; परंतु तू तुझे डोळे देशील का ते सांग!’’
भिकारी चपपला. तीस लाख दीनार आणि तेही डोळ्यांसाठी? त्याला डोळ्याचे महत्त्व उमजू लागले. राजाच्या अंधत्वाने त्याचे डोळे उघडले. एवढा मोठा राजा, पण केवळ डोळे गेल्याने किती परावलंबी व दुःखी झाला आहे! मग मी तर बोलून चालून भिकारी. माझी काय दशा होईल? छे! पन्नास लाख मिळाले तरी डोळे देऊन उपयोग नाही. डोळ्याविना जीवन म्हणजे पाण्याविना मासा. सर्वत्र अंधार! सर्वत्र शून्य!!
तो म्हणाला, ‘‘राजन्, तीस लाख सोडून पन्नास लाख दिले तरी मी माझा एक सुद्धा डोळा आता द्याव्यास तयार नाही. मला डोळ्याच्या अभावी जीवनच कंठता येणार नाही. तेव्हा डोळे सोडून दुसरं काहीही मागा.’’
राजा म्हणाला, ‘‘बाबा रे, क्षणापूर्वी तीस लाखाला तयार होतास आणि आता पन्नास लाखालाही तयार नाही म्हणतोस! हे कसे?’’
‘‘राजन्, क्षमा करा!’’ भिकारी बोलू लागला, ‘‘अविचारानं प्रथम मी हो म्हटलं, पण जसजसा मी विचार करू लागलो, तसतसं डोळ्यांचं महत्त्व मला अधिकच कळू लागलं. आता तुम्ही सारं राज्य देतो म्हणालात तरी माझे डोळे देण्यास मी राजी होणार नाही.’’
‘‘अरे पण जगात माझ्यासारखे आंधळे लोकही पुष्कळच आहेत ते आपलं जीवन कंठीत आहेतच की!’’
– राजानाने विचारले.
‘‘कंठीत बिचारे! पण मला ते जीवन नको आहे. डोळ्यांसहित मी भिकारी राहिलो तरी चालेल, परंतु डोळ्याविना मला राजपदच काय पण देवपददेखील नको आहे.’’
‘‘मंग तूच सांग, ज्यांना एक किंवा दोन्ही डोळे नाहीत अशा अनेक आंधळ्यांपेक्षा तू निश्चितच सुखी आहेस की नाही?’’
राजाने मूळ मुद्यावर येत प्रश्न केला.
‘‘यात का संशय? त्यांच्याहून मी कितीतरी सुखी आहे.’’ भिकारी सहजगत्या बोलला.
‘‘आणि माझ्याहूनदेखील!’’
‘‘हो! या दृष्टीने तरी आहेच’’ भिकारी हसत म्हणाला.
‘‘बरं! असेही कित्येक लोक जगात आहेत की, जे एक किंवा दोन्ही पायांनी पंगू असून बिचाऱ्यांना नीट चालतादेखील येत नाही.’’
‘‘असतील! मला काय करायचं त्यांना घेऊन?’’ भिकाऱ्याने राजाच्या प्रश्नातील रोख ओळखला नाही.
‘‘आणि एक किंवा दोन्ही हात तुटल्याने ज्यांना नीट खातापिताही येत नाही असेही काही हतभागी तू पाहिलेच असशील?’’ राजा एकापुढे एक प्रश्न विचारीतच राहिला.
‘‘हो! पुष्कळ आहेत, मी राहतो त्या धर्मशाळेत!’’ भिकारी म्हणाला.
‘‘असेच मुके, बहिरे, कान तुटलेले, नाक नसलेले, कुबड आलेले, वेडसर झालेले, कोड निघालेले, महारोगानं पछाडलेले असे कितीतरी लोक तू शहरात पाहतोस ना!’’
‘‘हो! रोजच भेटतात ते मला. परवा त्या कान तुटक्याशी तर माझं भांडण झालं होतं! देवळाजवळची रोजी माझी जागा काही केल्या तो सोडायला तयार होईना.’’ भिकारी.
‘‘असू दे. तसं रोजच भांडता तुम्ही सारे! पण मला हे सांग की यापैकी तुला एखादं व्यंग किंवा रोग आहे काय?’’
‘‘छे, बिलकुल नाही. त्या दृष्टीनं देवाची मर्जीच आहे माझ्यावर!’’ भिकारी समाधान व्यक्त करीत होता.
‘‘छान! तर मग या बाबतीत तू या सर्वहून बराच सुखी म्हटला पाहिजेस?’’ राजा.
‘‘फार सुखी! देव करो आणि त्यांच्यासारखे हाल माझे कधी न होवो!’’ भिकाऱ्याने करुणा भाकली.
‘‘बरं! पण का रे, तुझं वय काय?’’
‘‘असे की साठ एकसठ!’’
‘‘मग असेही कित्येक दुर्दैवी जीव असतील की ज्यांना जन्मतःच अगर बालवयातच मरण आलं असेल.’’
‘‘हो असतील की!’’ भिकारी.
‘‘आणि ऐन वयात आले नाही तोच अचानक रोगाला बळी पडलेली कित्येक पाहण्यात असतील?’’ राजा.
‘‘हो परवाच माझा एक सोबती तसा मेला. बिचाऱ्याला उचलायला देखील कोणी आला नाही लवकर!’’ भिकारी खेद व्यक्त करीत होता.
‘‘मग तू अद्यापि जिवंत आहेस, त्याअर्थी त्या सर्वहून सुखीच म्हणावास!’’ राजा.
‘‘यात का संशय? मी अजून दहा–वीस वर्षे तरी निश्चितच जगेन’’ भिकारी दृढतेने बोलला.
‘‘मग जा आता आणि तोवर देवाला उगीच नावे ठेवण्याऐवजी या अनेक दुःख नि त्रासापासून त्याने तुला वाचविले याबद्दल त्याचे उपकारच मान. पुनः कोणाला अशा अकारण शिव्या देऊन तोंड विटाळू नकोस. जा!’’ राजाने त्यास दृष्टी देत आज्ञापिले.
भिकाऱ्याचे डोळे उघडले. त्याने राजाचे पाय धरले व अश्रूंनी भिजवीत म्हटले, ‘‘राजन्! तू आंधळा नाहीस! मीच खरा आंधळा आहे. मला अन्नाबरोबर ही दृष्टी देऊन तू जन्माचं ऋणी केलं आहेस. जन्मोजन्मी विसरणार नाही तुमचे हे उपकार!’’
गोष्टीतील मर्म तुमच्या लक्षात आलेच असेल. आपली दृष्टी अशीच नेहमी दुःखाकडे व उणिवाकडेच पाहण्याची असते. थोडे काही थोडे न्यून भासले किंवा इच्छानुरूप न घडले की आपण संतापतो, खेद करतो, विषाद मानतो आणि अशा रीतीने रात्रंदिवस आर्तध्यान करीत राहतो. अशाने काय होणार? परिस्थितीत कोणता फरक पडणार? उलट पापबंध होऊन ती अधिकच बिघडणार. आर्तध्यानी जीवाला दुर्गती ठरलेली आहे. तेव्हा सुख व सुगती हवी असल्यास मनुष्याने नेहमी संतोषी वृत्ती ठेवून प्राप्त द्रव्यक्षेत्रकालादिकांचा अनुकूल उपयोग करून घेतला पाहिजे. तशी दृष्टीच तयार केली पाहिजे. असे झाल्यास आताही सुख व पुढेही सुखच सुख आहे.
प्रश्न ३१ – आपण सांगितलेली कथा खरोखरच अतिशय मार्मिक नि सूचक आहे. यात शंका नाही. एक वेगळी जीवन दृष्टीच आहे ही! व्यवहारात पाहावं तिथं बहुतेक त्या भिकाऱ्यासारखीच मनःस्थिती दिसते. जो तो आपल्या परिस्थितीला, दैवाला अगर देवाला (न जाणताच) नेहमी नावे ठेवताना आढळून येतो. आहे त्यात समाधान मानणारे क्वचित.
उत्तर – म्हणूनच दुःख, संताप, आकुलता, अशांती आणि निराशावाद यांचेच चोहोकडे साम्राज्य दिसते.
प्रश्न ३२ – खरे आहे आपले म्हणणे! पण मला वाटते जीवनात या साऱ्या गोष्टी एका दृष्टीने आवश्यकच नाहीत का? दुःख व आकुलतेशिवाय मनुष्याला सुखाची नि आनंदाची चव तरी कशी येणार? जेवणात तिखट, खारट पदार्थ असल्याशिवाय जेवण गोड कसे लागणार? शिवाय आहे त्या स्थितीत समाधान मानणे व अधिक उत्कर्षासाठी धडपड न करणे हाही एक प्रकारचा निराशावादच नव्हे का? मनुष्य महत्त्वाकांक्षी असावा असे एकीकडे म्हणावयाचे व दुसरीकडे त्याने संतोषवृत्ती धारण करावी, आपणास व इतर दुःखी जीवांहून सापेक्ष सुखी समजून आहे त्या स्थितीत समाधान मानावे असे सांगावयाचे, हा परस्पर विरोध नाही का? आहे त्यात कृत्रिम समाधान मानणारा उत्कर्षासाठी कसा धडपडेल? व धडपडल्याशिवाय मनुष्याचा उत्कर्ष कसा होईल?
उत्तर – तुमचा प्रश्न बरोबर आहे आणि तितकाच महत्त्वाचाही आहे. जीवनातील ‘संतोषवृत्ती’ला ‘निराशावाद’ म्हणणारे व एकंदरीत
अध्यात्म्यालाच ‘भौतिक पलायनवाद’ समजणारे कित्येक महाभाग आहेत, नाहीत असे नाही. पण या समजुतीत तत्त्वापेक्षा भ्रम, विचारापेक्षा गोंधळ आणि मुद्यापेक्षा अज्ञानच अधिक आहे. संतोषवृत्तीला निराशावाद म्हणणे म्हणजे असंतोषालाच संतोष म्हणण्यासारखे आहे.
निराशावाद हे नेहमी असंतोषातूनच जन्म पावतो. एक प्रकारच्या अयशस्वी जीवनातील पराभूत मनोवृत्तीचा तो द्योतक असतो. अशा निराशावादातून निर्माण होणारा संतोष हा खरा संतोषच नव्हे तो कृत्रिम, दिखाऊ, अतएव खोटा असून जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात तो आपली प्रगती रोकणारा व एकंदर जीवनच भकास बनविणारा असेल यात काहीच शंका नाही. निराशावादी जीवनाला ‘जीवन’ तरी कोण म्हणेल? ते तर साक्षात् ‘मरणच’! व अशा जीवनातून उगवणारा संतोष हा ‘संतोष’ तरी कसा म्हणावा? संतोषात सम्यक्दृष्टी हवी, निरागस आनंद हवा. ती एक ‘अंतस्तृप्ती’ आहे. ती बाह्य पदार्थावर किंवा अस्थायी परिस्थितीवर अवलंबून नसून अंतर्विकासावर व मानसिक उन्नतीवर आधारित आहे. हृदयाच्या कमी अधिक उंचीवर तिची तरतमता अवलंबून आहे. खरी संतोषवृत्ती निराशेच्या अंधारातून अगर वैफल्याच्या भावनेतून निर्माण होत नसून ती तत्त्वज्ञानाच्या प्रकाशातून व आत्मप्रत्ययाच्या आंतरिक आल्हादातून प्रगट होते व त्यांच्याच सत्संस्कारांनी ती विकास पावते. जेथे तत्त्वज्ञान नाही, स्वतःची जाणीव नाही व हिताहिताचा विवेक नाही, तेथे आनंद अगर आल्हाद कुठून येणार? व तृप्तीही कशी असणार? बाह्यतः ती दिसत असली तरी ती बेगडी आहे, खोटी आहे असेच म्हणावे लागेल.
खरी संतोषवृत्ती ही मानवी जीवनाच्या उत्कर्षाआड कधीच येत नाही. उलट ती आपणास जीवनाच्या विविध अंगाकडे समतोल व समीचीन दृष्टीने पाहण्यास शिकविते. सहाय्यक होते आणि त्यातूनच
जीवनाचा वास्तविक उत्कर्ष होतो. केवळ धनसंचय एवढेच काही जीवन नव्हे. ते एक बाह्य साधन आहे. धनवृद्धीबरोबर मनःशांती, समाधान, आरोग्य, विचारातील सखोलता, समीचीन दृष्टी, सम्यक् व्यवहार, सत्शीलता इत्यादी मूलभूत गोष्टीही वाढत गेल्या पाहिजेत. जीवन सर्वांगांनी विकसित झाले पाहिजे. ते तसे बनविण्याची उत्कट महत्त्वाकांक्षा बाळगली पाहिजे आणि त्या दृष्टीने योग्य प्रयत्न व्हाव्यास पाहिजेत. अशा प्रयत्नासाठी चित्ताची सदैव स्थिरता नि प्रसन्नता हवी असते. ही प्रसन्नता तत्त्वज्ञानाशिवाय व अंतस्तृप्तीशिवाय कशी प्राप्त होणार? विवेकपूर्ण संतोषाशिवाय तिचे दुसरे कोणते उगमस्थान आहे?
सारांश, ‘संतोष’ हा जीवनातील निराशावाद नसून तो एक प्रकारचा उज्ज्वल आशावाद आहे. जीवनाच्या विविधतेकडे आणि विशालतेकडे पाहण्याची ती एक समीचीन दृष्टी आहे. मानवी मनाला केवळ बहिर्मुख राहू न देता अधिकाधिक अंतर्मुख बनविणारी ती एक आंतरिक प्रेरणा आहे. तो नादान असा ‘भौतिक पलायनवाद’ नसून उलट भौतिकतेला अध्यात्मासाठी राबविणारी ती एक महान शक्ती आहे. जीवन सर्वांगांनी सुखी व समृद्ध बनविणारे ते एक रसायन आहे.
संतोषाला नीतिकारांनी अमृताची उपमा देऊन त्याची श्रेष्ठता नि उपयुक्तता सामान्य जनांच्या चांगलीच निदर्शनास आणली आहे. ते म्हणतात–
संतोषामृततृप्तानां यत्सुखं शान्तचेतसाम् ।
कुतस्तद धनलुब्धानामितश्चेतश्च धावताम् ॥
‘संतोषरूपी अमृताने तृप्त झालेल्या शान्त नि स्थिरचित्त अशा महापुरुषांना जे आंतरिक सुख व समाधान असते ते (आसक्ती व अविचेकाने अंध होऊन सदैव) इकडून तिकडे धावणाऱ्या धनलुब्धांना कोठून मिळणार?’
धनान्धांची विवेकहीन धडपड त्यांच्या खऱ्या उत्कर्षाला कारणीभूत न होता उलट तीव्र आसक्ती, आकुलता व तज्जन्य तीव्र पापबंध यामुळे ती अखेर त्यांच्या ऐहिक व पारलौकिक अपकर्षालाच कारणीभूत होते. रात्रंदिवस त्यांचे आर्त–रौद्ररूप परिणाम असतात व ते परिणाम त्यांना कोणत्या दुर्गतीत व दुःखाच्या खाईत नेऊन टाकतील हे सांगता येत नाही. धनासक्तीने मनुष्याला एक प्रकारचे अंधत्व येते. योग्यायोग्यतेचा विचार तो शांतपणे करू शकत नाही. जीवनाचा वास्तविक उत्कर्ष बाह्य धनवृद्धीत नसून आंतरिक धनवृद्धीत–गुणविकासात आहे, हे कटू सत्य त्यास ऐकवत नाही, साहवत नाही. अशा अंधत्वात होणारी त्याची सारी धडपड अखेर त्याच्या महान आकुलतेला व दुःखालाच कारणीभूत होत असल्यास त्यात नवल ते काय? या दुःखाचा अनुभव अनंत जन्मात अनंत वेळा मानवाने घेतला आहे. तो त्यास नवीन नाही. नवीन आहे संतोषजन्य आनंदाचा अकृत्रिम अनुभव! आजपर्यंत तो ह्या जीवाने कधीच चाखला नाही. तो प्रयत्नपूर्वक चाखणे, त्यासाठी रात्रंदिवस धडपडणे हे तुम्हा–आम्हा सर्वांचे या जन्मातील आद्य कर्तव्य होय. महत्त्वाकांक्षा बाळगायचीच तर ती या कर्तव्यपूर्तीची बाळगावी. अन्य साऱ्या आकांक्षा यापुढे तुच्छ आहेत असे समजावे.
प्रश्न ३३ – संतोषसुखासाठी महत्त्वाकांक्षेची काय जरूरी आहे? उलट ऐहिक जीवनातील महत्त्वाकांक्षेचा त्यागच त्यासाठी आवश्यक नाही का? कोणतीही आकांक्षा करावयाची सोडली की संतोष ठेवलेलाच! त्यासाठी प्रयत्नाची काय जरूरी?
उत्तर – नाही. ही आपली समजूत अत्यंत चुकीची आहे. संतोषासाठीही प्रयत्न हवाच. आत्मबलाशिवाय तो प्राप्त होत नाही. चित्ताची स्थिरता व शांती आत्मिक ‘वीर्य’ गुणाच्या विकासाशिवाय कशी शक्य आहे? संतोषात अन्य ऐहिक आकांक्षांना मर्यादा घातली जात असली तरी सात्त्विक नि विशुद्ध जीवन व्यतीत करण्याची महत्त्वाकांक्षा येथे अभिप्रेत आहेच. सर्वथा कांक्षेचा अभाव ही अध्यात्मातील फार पुढची अवस्था आहे. ती प्रस्तुत विचारकक्षेत येत नाही. ते अंतिम साध्य आहे व ते प्राप्त होईपर्यंत विशुद्ध जीवन जगण्याचा प्रयत्नपूर्वक अभ्यास करणे अवश्य आहे.
कांक्षेचा सर्वथा अभाव होईपर्यंत अशा विशुद्ध जीवनाची आकांक्षा उपादेयच मानली गेली आहे व तीच कल्याणकारीही आहे अध्यात्मप्रेमी जीवांना अशाच श्रेष्ठ जीवनाचा निरंतर ध्यास असतो. ते सदैव हाच विचार करतात –
मणि मुक्ता चाहूँ नहीं, नहीं राजसन्मान ।
इक मैं चाहूँ चरितयुत जीवन शुद्ध महान् ॥
मला मणिमुक्ता नकोत! राजसन्मानही नको! मला एकच एक हवे आणि ते म्हणजे सदाचारयुक्त विशुद्ध असे महान जीवन! त्यांची मोठ्यात मोठी महत्त्वाकांक्षा हीच. प्रयत्नांची दिशाही हीच. सारी शक्ती एकवटण्याची जागा हीच.
प्रश्न ३४ – असे विशुद्ध जीवन जगण्याचा मार्ग कोणता?
उत्तर – संतोषवृत्तीचा आश्रम! अनासक्त दृष्टी! आसक्तीनेच जीवनात अशुद्धता निर्माण होते आणि तीच महान आकुलतेला व दुःखाला कारण आहे. अंतस्तृप्ती अनासक्तीशिवाय शक्य नाही व अंतस्तृप्तीशिवाय जीवन शुद्धी नाही. जीवन म्हणजे सत्शीलता व या सत्शीलतेची सिद्धी संतोषावरच अधिष्ठित आहे. महामना पं. आशाधरजींनी सागारधर्मामृतात या विषयासंबंधी अत्यंत स्पष्ट विवेचन केले आहे. ते म्हणतात,
शीलवान् महतां मान्यो, जगतामेकमण्डनम् ।
स सिद्धः सर्वशीलेषु यः सन्तोषमधिष्ठितः ॥
शीलवान मनुष्य श्रेष्ठांनाही मान्य व आदरणीय असतो, विश्वाचे एकमेव भूषण असतो आणि सर्व प्रकारच्या शीलामध्ये तोच सिद्ध पूर्ण आहे की जो संतोषावर अधिरूढ आहे. संतोषी मनुष्यच सर्व शीलांची सिद्धी (प्राप्ती) करू शकतो.
या संतोषाचे महत्त्व उक्त पंडितजींनी पुढील श्लोकातून फारच बहारीने वर्णिले आहे. ते म्हणतात –
तत्र न्यञ्चति नो विवेकतपनो, नाश्यत्यविधातमी
नाप्नोति स्खलितं कृपामृतसरिन्नोदेति दैन्यज्वर ।
विस्निह्यन्ति न संपदो न दृशमभ्यासूत्रयन्त्यापदः
सेव्यं साधुमनस्विनां भजति यः सन्तोषमंहोमुषम् ॥
श्रेष्ठ साधू व स्वाभिमानी पुरुषांना सेवन करण्यायोग्य व पापनाशक असा संतोष जो मनुष्य धारण करतो, त्याचा विवेकरूपी सूर्य कधी अस्त्याला
जात नाही, अज्ञानरूपी रात्र तेथे व्याप्त होत नाही, दयारूपी अमृत कधी आटत नाही, दीनतारूपी ज्वर तेथे उत्पन्न होत नाही, संपत्ती त्याचे सान्निध्य कधी सोडीत नाही आणि आपत्ती आपली दृष्टीही त्याजकडे टाकीत नाही.’
सारांश, संतोषी मनुष्याचा विवेक सदैव जागृत राहत असल्याने तो जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात खाली न पडता उत्कर्षाच्या मार्गाने नेहमी पुढेच जात असतो. विरुद्ध परिस्थितीशी शांत चित्ताने झगडण्याची क्षमता व सहनशीलता, स्वभावातील मृदुता नि सरलता, तसेच जीवनातील शुचिता, समीचीनता व संयमशीलता इत्यादी एकाहून एक कठीण व दुर्मिळ गोष्टीचा सुंदर संगम संतोषी मनुष्याजवळ एकत्र पाहाव्यास मिळतो. या दृष्टीने त्याचे जीवन खरोखरच समुन्नत व भाग्यशाली बनलेले असते. पार्थिव संपत्ती त्याजजवळ कमी–अधिक असेल, कदाचित ती नसेलही, तथापि त्या संपत्तीहून सहस्त्रपट मोलाची नि महत्त्वाचे असलेले हे गुणवैभव त्यास खरी शान्ती नि समाधान देऊ शकते यात तिळमात्र शंका नाही. संपत्तीचे तरी साध्य हेच आहे ना ?
प्रश्न ३५ – खरे आहे आपले म्हणणे. पण ही दृष्टी व हा विवेक आमच्यासारख्या सामान्य जनांना कसा प्राप्त होऊ शकेल? आमची दृष्टी दृश्य अशा पार्थिव संपत्तीकडे जितकी आकृष्ट होते, तितकी ती अंतरंगातील चेतन संपत्तीकडे होत नाही ही वस्तुस्थिती आहे. अशा अवस्थेत रोजचे जीवन जगताना ज्या गोष्टीवाचून आमचे पदोपदी नडते, त्यांची उणीव अगर अभाव तीव्रतेने जाणवते व त्यामुळे असंतोषी नि असमाधान राहणे अपरिहार्य नव्हे का?
उत्तर – केवळ असंतोषी व असमाधानाने ती उणीव वा अभाव भरून निघत असेल तर ते अपरिहार्य खुशाल माना. पण तसे होते काय? आपल्या असंतोषापासून जर संपत्ती मिळाली तर जगात दरिद्री कोणी दिसलाच नसता! सर्वांनाच हा मार्ग सुलभ होता. पण वस्तुस्थिती अशी नाही. असंतोष हा इष्टप्राप्तीचा मार्ग नव्हे; उलट त्यातून झाले तर अनिष्टच अधिक व्हावयाचे. कारण असंतोषातूनच अविवेकाचा जन्म आहे व अविवेक हाच सर्व दुःखाचे मूळ आहे. त्याने आजवर कोणाचे भले केले आहे?
अविवेकानेच मनुष्य अंध होऊन हिताला अहित व अहिताला हितकारक मानतो. आपल्या परिस्थितीस किंवा दुःखास आपण स्वतः कितपत जबाबदार आहोत हे समजून न घेता तिचे खापर दुसऱ्यावर फोडतो. अमक्याने अमुक केले, तमक्याने तमुक केले. म्हणून असे घडले असे त्यास वाटते. कोणीच न मिळाला तर शेवटी कर्मावर दोषारोपण करून आपण जणू निर्दोषी आहोत असे जगास भासविण्याचा त्याचा प्रयत्न असतो. पण अशा रीतीने दुसऱ्यास दोषी ठरवून आपण नामानिराळे राहण्याने का तो निर्दोषी किंवा निरपराधी ठरणार आहे? ही निव्वळ आत्मवंचना होय. अशाने आपली जबाबदारी टळत नाही. वास्तविक आपलेच अज्ञान, मोह उतावीळपणा
किंवा अदूरदृष्टी ही अगर अशासारखी अन्य काही कारणे आपल्या प्रतिकूलतेत भर टाकीत असतात. अंतर्निरीक्षणाने ह्या गोष्टीचे बारीक संशोधन करून त्यात प्रथम सुधारणा केली पाहिजे. त्या दिशेने निष्ठा व निर्भयतेपूर्वक आपण होऊन पाऊल उचलले पाहिजे. नुसते दुःख किंवा आकुलता करून परिस्थिती थोडीच सुधारणा आहे?
विपदस्तु प्रतीकारो निर्भयत्वं न शोकिता ।
तच्च तत्त्वविदामेव तत्त्वज्ञाः स्यात् तद्बुधाः ॥
विपत्तीचा प्रतिकार निर्भयता आहे, दुःख किंवा शोक नव्हे. ही निर्भयता तत्त्वज्ञानी अर्थात प्रत्येक गोष्टीच्या कार्यकारण भावाचे यथार्थ ज्ञान करून घेणाऱ्या पुरुषांनाच प्राप्त होते. म्हणून अखेर ‘तत्त्वज्ञ’ बनणे हेच बुद्धिमंतांचे कर्तव्य होय. ऐहिक जीवनात जशी संपन्नअवस्था सारखी टिकून राहत नाही. तशी विपन्नअवस्थाही चिरकाल टिकून राहत नाही ही ज्ञानदृष्टी सदैव धारण केली तर मनुष्यास प्रतिकूलतेत ही उद्वेग, मनस्ताप अगर अशांती होत नाही. ही ज्ञानदृष्टी प्राप्त होणे कठीण वाटले तरी अभ्यासाने ती शक्य आहे. अज्ञानाचे अनादिकालीन संस्कार धुवून टाकणे प्रथम काहीसे कठीण जायचेच! पण ते असाध्य नाही, प्रयत्न केल्यावर जगात काय असाध्य आहे?
प्रश्न ३६ – जीवनातील प्रतिकूल परिस्थितीचाही मनुष्याने अनुकूल उपयोग करून घेतला पाहिजे असे आपण सांगितले पण ते कसे शक्य आहे? असे करता आले तर प्रतिकूलतेचा प्रतिकूलपणा तो काय राहील? त्यास प्रतिकूल हे नावच उरणार नाही. समजा, ज्याच्यावर
आपल्या घराचा सर्व भार अवलंबून आहे, अशी कुटुंबातील एखादी आधारभूत व्यक्ती गमावली अगर सर्वस्वाचा नाश झाला, अशा परिस्थितीतून चांगले ते काय काढावयाचे? किंवा तिचा अनुकूल उपयोग कसा करून घ्यावयाचा? हे अधिक स्पष्ट करून सांगाल तर बरे होईल.
उत्तर – बाह्य परिस्थिती अगर पदार्थ मूलतः न चांगले न वाईट, हे तत्त्व अगोदर निश्चित समजून घ्या. पदार्थांना किंवा परिस्थितीला बरे–वाईट मानणारी आपली स्वार्थी बुद्धी आहे. इष्ट किंवा अनिष्टपणा हा पदार्थाचा धर्म नसून तो रागी–द्वेषी मनाचा धर्म आहे. पदार्थांकडे पाहण्याच्या दृष्टीचा तो अपरिहार्य परिणाम आहे. एकच वस्तू आपणास कधी इष्ट तर कधी अनिष्ट वाटते. एकास चांगली तर दुसऱ्यास त्याचवेळी वाईट दिसते, ही गोष्ट मागे उदाहरणासह स्पष्ट झाली आहे, ती नीट ध्यानात घेतली पाहिजे.
बाह्य पदार्थांचे अगर परिस्थितीचे परिणमन सर्वस्वी आपल्या हाती नाही. प्रत्येक द्रव्य स्वतंत्र आहे व त्याचे परिणमनही त्या त्या द्रव्याच्या शक्ती व मर्यादानुरूप घडत असते. हा पदार्थशास्त्राचा मूलभूत सिद्धांत आहे तो कधीही विसरून भागणार नाही.
हे तत्त्व जितक्या लवकर स्पष्टपणे लक्षात येईल, तितक्या लवकर इतरही सर्व कोडी उलगडतील. एकदा तत्त्वदृष्टी प्राप्त झाली की परपदार्थांतील रागद्वेषजन्य इष्टानिष्ट बुद्धी निवळू लागते व ती ज्या प्रमाणात निवडते, त्या प्रमाणात अंतरंगामध्ये साम्यभाव जागृत होतो. हे चांगले व ते वाईट ही भावनाच राहत नाही. पदार्थांकडे पाहण्याची दृष्टी बदलते व जीवनाचा कायापालट होतो.
प्रश्न ३७ – परपदार्थाचे परिणमन जर आपल्या हाती नाही तर बाह्य परिस्थितीत पुढे तरी बदल कसा नि कुठून होणार ?
उत्तर – तिचा योग्य व अनुकूल उपयोग करूनच! तेवढेच आपल्या स्वाधीन आहे व वर्तमानकाळी करण्यासारखेही तेवढेच आहे. तत्त्वज्ञ पुरुष नेमके तेवढेच करीत असतो. कोणत्याही वस्तूचा अगर परिस्थितीचा आत्महितासाठी जास्तीत जास्त कसा नि कितपत उपयोग करता येतो, हेच तत्त्वज्ञ पाहतो व निरंतर त्या दिशेने प्रयत्न करतो. बाह्य पदार्थ (धनादी) वा व्यक्तीचा संयोग घडो अगर वियोग घडो, त्याची दृष्टी प्राप्त परिस्थिती आपल्या आंतरिक गुणविकासासाठी व स्वपरकल्याणासाठी कशी राबविता येईल. हेच शोधण्यात मग्न असते. त्याच्या पुढे दुसरा विचारच राहत नाही.
जसा व्यापारी कोणताही धंदा करताना प्रत्येक घडामोडीच्या वेळी यात आपला नफा किती व तोटा किती हे पडताळीत असतो व प्रत्येक घडामोडीत जास्तीत जास्त फायदा कसा होईल, हीच दृष्टी ठेवतो. तद्वत आपण सदैव आत्महिताची दृष्टी ठेवून प्रत्येक परिस्थितीचा तदनुकूल उपयोग करून घेतला पाहिजे.
या बाबतीत संत तुकारामाचा एक सुंदर अभंग तुम्हास आठवत असेल. त्यात स्वतःवर कितीही संकटे आली तरी ते त्या सर्वांचे आनंदाने स्वागतच करतात.
‘बरे झाले देवा, निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा केलो ।
अनुतापे तुझे राहिले चिंतन, झाला हा वमन संसार ॥
बरे झाले देवा, बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनामध्ये ।
बरे झाले जगी पावलो अपमान बरे गेले धन गुरे ढोरे ॥
बरे झाले नाही धरली लोकलाज, बरा आलो तुज शरण देवा ॥’
अशाच दुसऱ्याही एका अभंगात ते म्हणतात –
‘बाप मेला न कळता नव्हता संसाराची चिंता ।
बाईल मेली मुक्त झाली, देवे माया सोडविली ॥
पोरे मेली बरे झाले, देवे माया – विरहित केले ।
माता मेली मज देखता, तुका म्हणे हरली चिंता ॥’
दिवाळे निघाले, धन व गुरेढोरे गेली, कर्कशा स्त्री मिळाली, जगात अपमान झाला, एवढेच नव्हे तर आई, बाप, बायको, मुले सर्व मेली तरी तुकाराम ‘सर्व बरे झाले’ म्हणतात. का? तर ईश्वरभक्ती करण्यास अधिक अवसर मिळाला. सर्व मायापाश आपोआप कमी झाले. लौकिक दृष्टीने वरील सर्व घटना अनिष्ट, वाईट व दुःखदायक वाटतात, पण तुकारामाची दृष्टी वेगळी होती. त्यांना यात वाईट किंवा दुःख करण्यासारखे काही दिसलेच नाही.
मरण कोणाला चुकले आहे? रडून, हंबरडा फोडला तरी मेलेला माणूस परत येतो काय? तो गेल्यावर त्याबद्दल शोक किंवा दुःख करून काय उपयोग? उलट तशाही स्थितीचा सदुपयोग कोणत्या रीतीने करता येईल हे पाहावे, अशी जाणीव त्यांना असल्याने त्यांच्या दृष्टीस सारे बरेच बरे दिसले.
यावरून परिस्थिती स्वभावतः चांगली किंवा वाईट नाही. तिचा जसा उपयोग करून घ्यावा, तशी ती आहे. म्हणून ‘जेव्हा जे घडते, ते आपल्या चांगल्यासाठीच होय’ ही दृष्टी ठेवून मनुष्याने प्रत्येक गोष्टीतून किंवा घटनेतून चांगलेच काढण्यास शिकले पाहिजे. परिस्थितीची प्रतिकूलता किंवा अनुकूलता ही सर्वस्वी आपल्या मानण्यावरच जर अवलंबून आहे तर आपण सदैव अनुकूलतेचाच विचार का करू नये? दोन्ही मान्यता सापेक्षच आहेत. एका अपेक्षेने जी स्थिती प्रतिकूल दिसते, तीच दुसऱ्या अपेक्षेने अनुकूलही दिसू लागते. अज्ञानी मनुष्याला ती दृष्टी किंवा तो विवेक नसल्याने तो नेहमी प्रतिकूलतेच्या एकाच चष्म्यातून प्राप्त परिस्थितीकडे
पाहतो आणि दुःखी कष्टी होतो. हा चष्मा बदलणे आवश्यक आहे. प्राप्त स्थिती ही जरी बहुतांशी पूर्वकर्माधीन असली, तथापि भविष्य मात्र आपल्या स्वाधीन आहे. आपण बनवू, तसे ते बनू शकते आणि हे सामर्थ्य केवळ वर्तमान स्थितीचा जास्तीत जास्त आत्महितासाठी सदुपयोग करण्यानेच प्राप्त होते. म्हणून मनुष्याने तेवढेच करणे इष्ट नि आवश्यक आहे. तसे झाल्यास वर्तमानातही सुख व पुढेही सुखच प्राप्त होईल.
प्रश्न ३८ – बाह्य परिस्थिती चांगली किंवा वाईट मानणे हे जर केवळ कल्पनामात्र आहे तर ‘आपण नेहमी चांगले निमित्त मिळवावे, वाईट टाळावे, सत्संगती धरावी, कुसंगती सोडावी, शुभ क्रिया आचराव्यात, अशुभापासून दूर राहावे’ इत्यादी उपदेश का करण्यात येतो ? असे सांगणे ही तात्त्विक विसंगती नव्हे का ?
उत्तर – निमित्ताकडे दृष्टी ठेवून, त्यास प्राधान्य देऊन तसे बोलले जाते. चांगले होण्याला जे जे निमित्त पडते ते ते चांगले व वाईट होण्याला जे निमित्त पडते, ते वाईट याप्रमाणे परिणामाकडे लक्ष ठेवून त्या त्या वस्तूवर तो आरोप केला जातो. हा व्यवहार आहे, परमार्थ नाही.
सर्वसामान्य लोकांना ज्या परिस्थितीतून आत्महित करणे सुलभ जाते, ती चांगली व त्याउलट असेल ती वाईट, असा सामान्यतः भेद उपचाराने केला जातो ; परंतु तत्त्वज्ञ पुरुष प्रतिकूल परिस्थितीवरही मात करतो. कारण त्याला प्रतिकूल अनुकूल हा भेदच असत नाही. त्यास आत्महितासाठी सर्वत्र अनुकूल व चांगलेच असते. सारांश, परमार्थाने पर पदार्थ चांगला अगर वाईट मुळीच नाही.
प्रश्न ३९ – कुटुंबापैकी आपल्या एकावरच अनिष्ट वा दुःख प्रसंग आला तर तत्त्वदृष्टी व समाधान वृत्ती ठेवणे शक्य आहे, पण जिथे प्रपंच–परिवार मोठा असतो व त्याची जबाबदारी एकावरच असते, त्या ठिकाणी सर्वांच्या सुखदुःखांशी त्याचे सुखदुःख निगडित असताना ही दृष्टी नि हे समाधान कसे शक्य आहे ?
उत्तर – अभ्यासाने व सतत संस्काराने सारे शक्य आहे. वास्तविक त्याच ठिकाणी ह्या दृष्टीची व समाधानाची अधिक आवश्यकता नि उपयोगिता असताना तिथे ती कशी शक्य आहे, असे म्हणून कसे चालेल ?
शिवाय दुसऱ्याचे चांगले अथवा वाईट खऱ्या अर्थाने आपण काहीच करू शकत नाही, मग तो कोणीही असो. ते प्रत्येकाच्या उपादानावर व आनुषंगिक पुण्यपापावर अवलंबून आहे. आपण फार तर केवळ निमित्तमात्र होऊ शकतो. त्यांच्या पापाचा तीव्र उदय असला व आपण कितीही चांगले करण्याचा आटोकाट प्रयत्न केला तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. अखेर ते दुःखी कष्टीच राहतील. या उलट त्यांचे पुण्य बलवत्तर असले तर आपल्या प्रयत्नाशिवायही त्यांचे चांगले होत असलेले दिसेल. अशी ही वस्तुस्थिती आहे. तथापि प्रत्येक जीवाचे उपादान अदृश्य असल्याने आपणास ते अगोदर कळू शकत नाही. म्हणून आपण सदैव त्यांचे चांगलेच करीत राहण्याचा प्रयत्न करणे अर्थात त्यास अनुकूल निमित्त होत राहणे एवढे आपले कर्तव्य ठरते. प्रत्यक्ष फळ ज्याच्या त्याच्या पात्रतेप्रमाणेच त्यास मिळणार आहे. त्याबद्दल आपण हर्षविषाद मानण्याचे कारण नाही. प्रत्येक गोष्टीचा कार्यकारण संबंध व यथार्थ स्वरूप नीट समजले की मग मनुष्यास हर्षविषादाचे धक्के बसत नाहीत.
प्रश्न ४० – आपल्या हाती जर दुसऱ्याचे बरे करणे नाही तर सर्व जीवांसंबंधी कल्याणाच्या भावना बाळगणे किंवा परोपकारादी करणे हे सारे व्यर्थच म्हणावे लागेल ?
उत्तर – अजिबात नाही. हा निमित्तनैमित्तिक संबंध आहे. दुसऱ्याचे उपादान अथवा पुण्यबळ चांगले असेल तर आपल्या सद्भावना व साहाय्यादी उपकारकच होतील हे निश्चित ; परंतु ते तसे नसेल तरी आपल्या सद्भावना व सत्क्रिया व्यर्थ कधीच जात नाहीत. दुसऱ्यास जरी त्यांचा उपयोग झाला नाही, तरी आपल्या समीचीन परिणामांचे सम्यक् फल आपणास मिळाल्याशिवाय कसे राहील ? शुभ परिणामाचे फल शुभ बंध व अशुभाचे फल अशुभ बंध हे तर निसर्गतःच ठरले आहे. आत्मानुशासनाकारांनी म्हटलेच आहे –
परिणाममेव कारणमाहु खलु पुण्यपापयोःप्राज्ञाः ।
तस्मात् पापापचयःपुण्योपचयश्च सुविधेयः ॥
– पुण्य व पापाचे कारण त्या त्या जातीचे परिणामच होत, असे ज्ञानी पुरुष सांगतात. म्हणून (आपल्या शुभ परिणामांनी) अधिकात अधिक पापाचा अपचय (नाश) व पुण्याचा उपचय (साठा) करावा.
सारांश, आपण सतत स्वतःची परिणामविशुद्धी ठेवली पाहिजे. त्यामुळे दुसऱ्याचे हित होईल किंवा त्याच्या प्रारब्धानुरूप कदाचित होणारही नाही, पण आपले मात्र निश्चित हितच होईल.
प्रश्न ४१ – कार्य करीत असताना त्याच्या सफलते वा विफलतेमुळे हर्ष–विषाद होणे अपरिहार्य नाही का ?
उत्तर – नाही. ज्ञानी जीवाला हर्ष–विषाद होणार नाही. हर्ष–विषाद तर बाह्यदृष्टीमुळे होतो. ज्ञानी अंतरात्मा आहे. त्याची अंतर्दृष्टी असते.
परद्रव्याचे परिणमन आपल्या हाती नाही. कार्याची सफलता–विफलता ती तर ज्याचे जसे उपादान व निमित्त असेल त्याप्रमाणे कार्य होणार. आपण कोण करणार ? असे ज्ञानी समजतो. म्हणून आपले कर्तव्य अंतःकरणपूर्वक करीत असताना ते सफल अगर विफल झाले तरी त्याला हर्षविषाद होत नाही.
ह्या उलट अज्ञानी मी दुसऱ्याचे बरे–वाईट करू शकतो वा परद्रव्य माझे बरे–वाईट करते. ह्या मिथ्या–विपरीत मान्यतेमुळे परद्रव्यामध्ये इष्ट–अनिष्ट बुद्धी व अहंकार, ममकार भाव करतो व दुःखी होतो. जसे तृषार्त हरीण मृगजळामध्ये पाण्याची खोटी कल्पना करून मृगजळालाच पाणी समजून त्याच्यामागे धावते व शेवटी पाण्यावाचून व्याकुळ–दुःखी होते. कधी कधी प्राणालाही मुकते. अशीच अवस्था अज्ञानी जीवाची होते.
ज्ञानी यथार्थ वस्तुस्वरूप जाणतो. त्याची परद्रव्यामध्ये कर्तृत्वबुद्धी नसते व इष्ट अनिष्टबुद्धी ही नसते. मग परद्रव्याच्या परिणमनाविषयी त्याला आकुलता किंवा हर्ष कसा होईल? होणार नाही. तो असे समजतो की आकुलता करूनही ज्याच्या त्याच्या उपादान व निमित्तअनुरूप जे होणार ते होणार व निराकुलतेनेही तेच होणार. मग निराकुल राहणे श्रेष्ठ नाही काय? ‘परपरिणति नही निज आश्रित’ पर द्रव्याचे परिणमन आपल्या हाती नाही – आधीन नाही. ह्या तत्त्वावर त्यांची दृढ श्रद्धा असते.
प्रश्न ४२ – जीवन निराकुल होण्यासाठी काय करावे?
उत्तर – निराकुल, सुखी जीवन पाहिजे असेल तर सम्यग्दर्शन प्राप्त केले पाहिजे. सम्यग्दृष्टीच सदा सुखी–निराकुल असतो. ‘सुखीया सदैव ऐसे जीव समकिती है।’ सम्यग्दर्शन हा आत्म्याचा स्वभाव आहे. त्याची प्राप्ती कठीण नाही. ते दुर्लभ नाही. मात्र चिकाटीने प्रयत्न करायला पाहिजे. सम्यग्दर्शनाचे महत्त्व पं. दौलतरामजींनी थोडक्यात, पण सुंदर सांगितले आहे.
तीन लोक तिहुकाल मांहि नहीं दर्शनसो सुखकारी ।
सकल धरमको मूल यही इस बिन करणी दुखकारी ॥
तिन्ही लोकात व तिन्ही काळात सम्यग्दर्शनासारखी सुखकारक अशी दुसरी वस्तू नाही. सर्व धर्माचे मूळ सम्यग्दर्शन आहे. त्याशिवाय बाकीच्या सर्व क्रिया दुःखकारक आहेत.
सारांश – सर्वोच्च शाश्वत सुखाचे–मोक्षसुखाचे साधन सम्यग्दर्शन आहे.
लाख बातकी बात यह, कोटी ग्रंथ का सार ।
जो सुख चाहे भ्रात तो आतम अनुभव करो ।
प्रश्न ४३ – सम्यग्दर्शन म्हणजे काय ?
उत्तर – १) ‘दर्शनं आत्मविनिश्चितिः’ आपल्या स्वरूपाचा आत्मस्वरूपाचा निश्चय म्हणजे सम्यग्दर्शन.
२) अनादिकाळापासून हा जीव अज्ञानाने पुद्गलाशी तन्मय होऊन शरीरादी परद्रव्यालाच ‘मी’ म्हणजे आत्मा समजत आला. परद्रव्याच्या निमित्ताने होणाऱ्या विकार भावालाच, विभावालाच आपला स्वभाव समजत आला. ही विपरीत खोटी मान्यता सोडून आत्म्याला आत्मरूपाने ओळखणे अर्थात् आपल्या शुद्ध स्वरूपाला ओळखणे म्हणजे सम्यग्दर्शन.
३) अज्ञानी आजपर्यंत सुखासाठी किंवा जिज्ञासा म्हणून बाह्य जगाला जाणून घेण्यात सर्व जन्म घालवत आला. पण स्वतः मी कोण ? माझे खरे स्वरूप काय ? सुख कशात आहे ? कोठे आहे ? ह्यासंबंधी क्षणभरही विचार केला नाही व करीत नाही. त्यामुळे दुःखमय संसारभ्रमण चुकले नाही.
४) ‘ज्याला ज्ञान होते – जो जाणतो तो मी. मी शुद्ध चिन्मात्र, अखंड, अविनाशी, आनंदमयी आहे’ असा आत्मस्वरूपाची निश्चय दृढश्रद्धा म्हणजे सम्यग्दर्शन.
५) ‘जीवोऽन्यः पुद्गलश्चान्य इत्यसौ तत्त्वसंग्रहः ।’
असे श्री पूज्यपादाचार्यांनी इष्टोपदेश ग्रंथाच्या शेवटी सर्व तत्त्वांचा सार सांगितला आहे जीव आणि पुद्गल भिन्न–भिन्न आहेत. दोहोंचे स्वरूप एकमेकाहून अत्यंत भिन्न आहे. जीव (आत्मा) ज्ञानमयी अमूर्तिक व चेतन आहे तर पुद्गल शरीरादिक ज्ञानशून्य, जड, मूर्तिक, अचेतन आहे. अशा वस्तुस्वरूपाचा नक्की निर्णय अर्थात् स्वपरविवेक भेदविज्ञान म्हणजे सम्यग्दर्शन.
६) पं. दौलतरामजींनी परद्रव्यनतैं भिन्न आपमें रुचि सम्यक्त्व भला है। असे सम्यग्दर्शनाचे लक्षण केले आहे. ‘मी परद्रव्याहून भिन्न आहे’ अशी आपल्या आत्मस्वरूपाची श्रद्धा ते सम्यग्दर्शन.
या सर्वांचा सार एकच – मी सर्व परद्रव्याहून भिन्न चैतन्यस्वरूपी ज्ञाताद्रष्टा आहे. अशा स्वरूपाची दृढश्रद्धा म्हणजे सम्यग्दर्शन.
प्रश्न ४४ – तत्त्वार्थसूत्रामध्ये ‘तत्त्वार्थश्रद्धानं सम्यग्दर्शनम्’ असे सम्यग्दर्शनाचे लक्षण केले आहे, असे वेगवेगळे कां ?
उत्तर – एकच गोष्ट वेगवेगळ्या अपेक्षेने व पद्धतीने सांगितले आहे. पण सर्वांचा आशय (भाव) एकच आहे.
सूत्रात तत्त्वार्थ श्रद्धान हे सम्यग्दर्शनाचे लक्षण सांगितले आहे. तत्त्वार्थ श्रद्धान दोन प्रकारचे आहे. एक सामान्यरूप व एक विशेषरूप. परभावापासून भिन्न अशा आपल्या चैतन्यरूप आत्मतत्त्वाची श्रद्धा त्याला सामान्य तत्त्वार्थ श्रद्धान म्हणतात. आणि जीव, अजीव आदी सात तत्त्वांना विशेष प्रकारे जाणून अर्थात् त्यांचे स्वरूप भेद तसेच त्यातील हेय – उपादेय तत्त्व जाणून त्यांचे तसे श्रद्धान करणे ह्याला विशेष तत्त्वार्थश्रद्धान म्हणतात. राजमार्गाच्या मुख्य मार्गाच्या अपेक्षेने सात तत्त्वांना यथार्थपणे जाणणे हेच सम्यक्त्वाला – गुरूमागं सम्यक्श्रद्धानाला कारण आहे. कारण की जर तत्त्वांना नाही जाणले तर श्रद्धान कशाचे करावयाचे म्हणून तत्त्वार्थ श्रद्धानाला सम्यग्दर्शन म्हटले आहे. हे श्रद्धान निश्चय सम्यग्दर्शनला कारण आहे. म्हणून त्याला व्यवहार सम्यग्दर्शन म्हटले आणि परभावापासून भिन्न अशा आपल्या चैतन्यस्वरूपाचे श्रद्धान हे निश्चय सम्यग्दर्शन. निश्चय सम्यग्दर्शन हे साक्षात मोक्षाचे कारण आहे.
प्रश्न ४५ – सामान्यरूप तत्त्वार्थश्रद्धान असले म्हणजे झाले मग विशेषरूप तत्त्वार्थश्रद्धानाची काय आवश्यकता ?
उत्तर – ‘सामान्याशास्त्रतो नूनं विशेषो बलवान् भवेत्’ ।
सामान्यापेक्षा विशेष अधिक कार्यकारी चांगले आहे. विशेष तत्त्वार्थश्रद्धानाने श्रद्धा अधिक दृढ होण्याला मदत होते. सामान्यरूप तत्त्वार्थश्रद्धान हे नारकी–तिर्यंचादी सर्व सम्यग्दृष्टी जीवांना असते व विशेषरूप तत्त्वार्थश्रद्धान मनुष्यदेवादी विशेष बुद्धिवान जीवाला असते. सात तत्त्वांचे विशदरूप समजले तर सम्यग्दर्शनाची प्राप्ती सुलभ होते.
विशेष ज्ञानपूर्वक जी श्रद्धा ती उत्तरोत्तर गाढ, परमावगाढ स्वरूपाला प्राप्त होते. म्हणून विशेषरूप तत्त्वार्थश्रद्धान हे विशेष कार्यकारी चांगले आहे.
थोडक्यात एकच सांगावयाचे की हरप्रयत्नाने, हर प्रकाराने सम्यग्दर्शनाची प्राप्ती करून घ्यायला पाहिजे.
दौल समझ यह सुन चेत सयाने काल वृथा मत खोवै ।
यह नरभव फिर मिलन कठीण है, जो सम्यक् नही होवै ॥
प्रश्न ४६ – सम्यक्त्व प्राप्तीसाठी काय करायला पाहिजे?
उत्तर – ‘आगम अभ्यास’ हा श्रेष्ठ उपाय आहे. आगम चेट्ठा तदो जेट्ठा असे प्रवचनसार ग्रंथात श्री कुंदकुंद आचार्यांनी सांगितले आहे. आगम म्हणजे शास्त्र–जिनवाणी. त्याच्या अध्ययनाने, स्वाध्यायाने, पदार्थांचे यथार्थ ज्ञान होते. पदार्थांच्या यथार्थ ज्ञानाने भेदज्ञान–स्वपरविवेक प्राप्त होतो. स्वपरविवेक म्हणजेच सम्यग्दर्शन.
सारांश – आगम अभ्यास, शास्त्र स्वाध्याय हा सम्यक्त्व प्राप्तीचा श्रेष्ठ उपाय आहे. ना कायक्लेश लागत, ना पैसा अडका. म्हणून प्रत्येकाने न चुकता शास्त्र स्वाध्याय करावा. विशेषतः अध्यात्म शास्त्राचे वाचन करावे. त्यायोगे तात्त्विक दृष्टी प्राप्त होते.
प्रश्न ४७ – आम्ही तर रोज स्वाध्याय करतो पण दैनंदिन जीवनात त्याचा विशेष उपयोग दिसत नाही.
उत्तर – केवळ दैनंदिन दिनचर्या उरकायची म्हणून वाचले, वाचून टाकले तर कसा उपयोग होईल? आपण जे वाचतो ते अर्थ समजून अर्थाकडे लक्ष ठेवून वाचायला पाहिजे. वाचल्यानंतर त्यातल्या मौलिक तत्त्वांचे चिंतन, मनन करायला पाहिजे व ते आपल्या जीवनात–आचारविचारात उतरायला पाहिजे. तसा प्रयत्न करत राहायला पाहिजे, तरच स्वाध्यायाचा उपयोग होईल.
दिवा हा प्रकाशाचे काम करतो त्याप्रमाणे आगम हे मार्गदर्शनाचे काम करते. उपयोग करून घेणे आपल्या हाती आहे.
जीवनात अस्वस्थ करणारे प्रसंग नेहमीच येतात. अशावेळी त्याचा उपयोग केला नाही तर काय उपयोग? उपयोग केला तर आकुलता कमी होईल. अस्वस्थता होणार नाही.
कर्माच्या उदयाला अनुसरून निमित्ते तर नेहमीच येतात, त्यावेळी आकुलता व्हायला नको. कदाचित झाली पण ती थोडावेळ टिकली तर समजावे आपण समीचीन मार्गावर आहोत. आगमाचा–अध्यात्माचा उपयोग झाला.
तुम्ही अध्यात्मशास्त्र वाचता ना? मग वाचनाने आपली परिणती शास्त्र वाचण्याअगोदर जी होती त्यापेक्षा बदलली आहे की नाही? ह्याचे अंतर्निरीक्षण आपण आपले करावे. अज्ञानावस्थेत जी आकुलता होत होती तशीच आताही होते की कमी झाली? कमी झाली असेल तर अध्यात्माने आपले कल्याण केले–फायदा केला हे निश्चित.
ज्यांला तत्त्व समजले नाही अशा जीवाशी आपली तुलना करून पाहावी म्हणजे फरक लक्षात येईल.
प्रश्न ४८ – आपल्याला सम्यक्त्व आहे का कसे ओळखावे ?
उत्तर – सम्यग्दृष्टीचे कोणते परिणाम असतात हे शास्त्रात सांगितले आहेत. ते दर्पण आहे. त्या सदृश आपले परिणाम आहेत काय हे आपण पाहू शकतो. त्यावरून ओळखू शकाल.
आपल्याला सम्यग्दृष्टी व्हायचे असेल तर त्याप्रमाणे परिणाम ठेवण्याचा सतत प्रयत्न करावा. प्रयत्न फुकट जात नाहीत. यथाकाल होईलच.
निरभिलाष करणी करै, भोग अरुचि परिणाम
निरभिलाष क्रिया व भोगासंबंधी अरुची, अशी सम्यग्दृष्टी जीवाची परिणती असते.
प्रश्न ४९ – निरभिलाष करणी म्हणजे काय ?
उत्तर – परद्रव्याचा कर्ता, भोक्ता आत्म्याला – आपल्याला न समजणे म्हणजे परद्रव्याच्या क्रियेसंबंधी अहंकार न होऊ देणे व त्याचे कर्तृत्व आपल्याकडे न घेणे म्हणजे निरभिलाष क्रिया होय.
प्रश्न ५० – क्रिया करायची व कर्तृत्व आपल्याकडे न घेणे हे कसे ?
उत्तर – कर्तृत्व आपल्याकडे न घेणे म्हणजे त्या क्रियेसंबंधी अहंकार व ममकार नसणे. त्या क्रिया पौद्गलिक आहेत. त्यासंबंधी इच्छा ज्ञानी जीवास असत नाही. तो ज्या पदात असतो त्या पदाची सर्व कर्तव्ये करीत राहतो; परंतु त्याच्या फलात इष्ट–अनिष्ट बुद्धी ठेवत नाही. त्यापासून अमुकच फल मिळावे अशी त्याची आसक्ती असत नाही. आपण कर्तव्य केले ह्यातच त्याचा संतोष सामावलेला असतो. अज्ञानी माणसाप्रमाणे इष्टफलाची प्राप्ती झाली तर आनंद आणि न झाला तर विषाद असे ज्ञानी कधीही करीत नाही.
सम्यक्त्वी जीवाशिवाय निरिच्छ बुद्धित्व निष्काम भाव इतरांकडून होणे शक्य नाही.
प्रश्न ५१ – सम्यक्त्वीलाही इच्छा असतेच की मग तो निरिच्छ कसा?
उत्तर – त्याची इच्छा चारित्रमोहनीय कर्माच्या उदयाने झालेली असते, दर्शन मोहनीयाने नव्हे अर्थात् मिथ्यात्वपूर्वक नव्हे. त्याला इष्ट समजत नाही.
त्याचा रागात राग असत नाही. इच्छेत इच्छा असत नाही. अर्थात् रागात आनंद मानत नाही व इच्छेला इष्ट समजत नाही. त्यांना तो हेय समजतो. या उलट अज्ञानी रागात बुडलेला असतो, त्याला तो कधीच हेय समजत नाही. हा फरक काय लहान आहे? महदंतर आहे.
ज्ञानी जीवाला कशाचीही इच्छा असत नाही. असली तर एक मात्र आत्मलाभाची – शुद्ध आत्मस्वरूपाच्या प्राप्तीची.
स्पृहत्यात्मलाभाय गत्वाऽन्यत्रानुत्पम्यते ।
कदाचित अन्य इच्छा झाली तर त्याला त्याबद्दल अनुताप होतो. ज्ञानी सम्यग्दृष्टी जीवाची दृष्टी सर्व अंतरंग म्हणजे शुद्ध आत्म्याकडे वळलेली असते. तो असे समजतो की मी अनंत गुणसंपन्न आहे. शुद्ध दृष्टीने अनंतज्ञान, अनंतदर्शन, अनंतसुख, अनंतवीर्य आदी अनंतगुण माझ्या आत्म्यातच आहेत, मी सर्व ऋद्धी–सिद्धीचा भांडार आहे. मग मी कशाची इच्छा करू?
ऋद्धी सिद्धी वृद्धी दिसे घटमें प्रगट सदा ।
अंतर की लच्छीसो अजाची लच्छपती है ॥
ह्याहून असा कोणता पदार्थ मोलाचा या जगात आहे की त्याची मी इच्छा करावी. अहमिंद्रपदही त्यापुढे अवांछनीय आहे.
एकमेव हि तत्स्वाद्यं विपदामपदापदम् ।
अपादान्येव भासन्ते पदान्यन्यानि यत्पुरः ॥
ते एक परमात्मपदच स्वाद घेण्यायोग्य अनुभवण्या योग्य आहे की जे आपत्तीचे स्थान नाही. ज्यासमोर सर्व अपद वाटतात. त्याच्यासमोर अहमिंद्र, चक्रवर्ती आदिक पदे तुच्छ वाटतात. ते मिळविण्यायोग्य नाहीत असे ज्ञानी जीवाला वाटते म्हणून तो एक त्या शुद्ध आत्म्याचीच भावना करीत राहतो.
ज्ञानी जीवाचे अंतरंग परिणाम कसे असतात याबद्दल आपण विचार करीत आहोत.
मन, वचन, कायेच्या क्रिया कोणत्याही कशाही राहोत पण अंतरंग मात्र त्याचे शुद्ध आत्म्याकडेच निरंतर झुकलेले असते हे निश्चित समजावे.
ज्ञानी आपल्या दोषांचे खापर दुसऱ्यावर फोडत नाही. तो आपले अंतरंग निरीक्षण करून आपले शत्रू, दोष शोधून त्यावर हल्ला चढवतो, त्याची हकालपट्टी करतो. अर्थात् त्यांना दूर करतो, थारा देत नाही.
अपना रिपु मैं आप हूँ तथा मित्र ही आप ।
देता मुझको कौन है, सौख्य और संताप ॥
माझे विकारभावच माझे शत्रू आहेत. तेच माझ्या दुःखाला कारण आहेत व आत्मस्वभाव माझा मित्र आहे. तो सुखकारक आहे असे ज्ञानी समजतो.
क्रोध–मान–माया धरत, लोभसहित परिणाम ।
ये ही तेरे शत्रू है समझो आतमराम ॥
हे आत्मन्, क्रोध मान माया युक्त असे तुझे परिणाम हेच तुझे शत्रू आहेत असा विचार करून ज्ञानी सतत हरप्रयत्नाने त्यांना दूर करण्याचा प्रयत्न करतो, कदाचित झाले त्याबद्दल त्याला अनुताप होतो. रागद्वेष हा माझा स्वभाव नाही. मी ज्ञानानंदमयी शुद्ध चिन्मात्र आहे. विभाव परिणती म्हणजे दुःख व स्वभाव परिणती हेच सुख ही त्याची दृढ श्रद्धा असते.
प्रश्न ५२ – रागद्वेषादी विकार न होऊ देण्यासाठी काय करावे ?
उत्तर – सतत स्वस्वरूपाची जागृती ठेवावी व रागद्वेषाच्या निमित्तापासून दूर राहावे.
रागद्वेषौ प्रवृत्तिः स्यान्निवृत्तिस्तन्निरोधनम् ।
तौ च बाह्यार्थसंबद्धौ तस्मात्तान् सुपरित्यजेत् ॥
रागद्वेषाची प्रवृत्ती बाह्यपदार्थाच्या संबंधाने ‘निमित्ताने’ होते. म्हणून रागद्वेषाच्या निवृत्तीसाठी बाह्यपदार्थाचा त्याग करावा.
रागद्वेषनिवृत्यर्थं चरणं प्रतिपद्यते साधुः ।
साधू रागद्वेषाच्या निवृत्तीसाठी अंतरंग व बाह्य चारित्राचा स्वीकार करतात. रागद्वेषाची निवृत्ती अहिंसादी चारित्राने होते. रागद्वेषाची निवृत्ती म्हणजेच अहिंसेचे पालन.
प्रश्न ५३ – रागद्वेषाचे किंवा चारित्र न होण्याचे कारण कर्मच ना ?
उत्तर – आपण आपल्या दुर्बलतेचे खापर कर्मावर फोडतो. कर्म तर जड आहे. आपण होऊन कर्माच्या आधीन होतो व कर्माला दोष देतो. पुरुषार्थपूर्वक आत्मा स्वद्रव्याकडे झुकला तर उदयात् आलेले कर्म जीवाचे काहीच वाकडे करीत नाही. फल न देता निघून जाते. ह्याप्रमाणे आपण कर्मावर विजय मिळवून मोक्ष प्राप्त करू शकतो. अन्यथा परद्रव्याकडे उपयोग असला तर बंध होतो.
कर्मापासून आपले स्वरूप भिन्न आहे असे अज्ञानी कधीच पाहत नाही. नेहमी कर्माच्या उदयातच लीन राहतो. त्यालाच आपले स्वरूप समजतो व इष्ट–अनिष्ट भाव करतो. जे करायला पाहिजे ते करीत नाही व जे न करावे तेच करतो व दुःख भोगतो.
प्रश्न ५४ – कर्माचा तीव्र उदय असताना आत्म्याकडे उपयोग कसा लागेल?
उत्तर – नेहमीच कर्मांचा उदय सारखा अclockत नाही. कधी तीव्र तर कधी मंद अशी कर्माच्या उदयाची तरतमता सतत होत राहते. कदाचित तीव्र उदयाच्यावेळी आत्म्याकडे उपयोग लावणे कठीण जाईल. पण मंद उदयाच्या वेळी तसा पुरुषार्थ प्रयत्न केल्यास – निरंतर आत्मचिंतन करीत राहिल्यास आगामी कर्माच्या तीव्र उदयाचे ही मंद–मंदतर परिणमन होत जाते व आत्मानुभव सुलभ होतो. त्यासाठी शुद्धात्मभावनेची वारंवार पुट चढवली पाहिजेत. सारखे संस्कार करीत राहायला पाहिजे.
सोहमित्यात्त संस्कारस्तस्मिन् भावनया पुनः ।
तत्रैव दृढ संस्कारात् लभते ह्यात्मनि स्थितिम् ॥
‘मी परमात्मा आहे’ ह्या संस्काराने व वारंवार केलेल्या भावनेने संस्कार दृढ होतात व दृढ संस्काराने आत्मस्वरूपात स्थिरता प्राप्त होते. श्री पूज्यपादाचार्यांनी आत्मानुभवाचा हा अनुभूत सोपा उपाय सांगितला आहे. त्यांनी समाधिशतक ग्रंथात सर्व भार संस्कार, अभ्यास व पुनः पुनः भावनेवरच दिला आहे. ज्ञानाला अभ्यासाची जोड पाहिजे म्हणजे संस्कार दृढ होतात.
एकोऽहं निर्ममः शुद्धो ज्ञानी योगींद्रगोचरः ।
बाह्याः संयोगजाः भावा मत्त: सर्वेऽपि सर्वथा ॥
मै अनंतसुखको धनी सुखमय मोर स्वभाव ।
अविनाशी आनंदमय सो हौं त्रिभुवन राय ॥
हे संस्कार निरंतर व्हायला पाहिजेत. त्याचा सतत ध्यास पाहिजे.
ज्ञानी निरंतर परमात्म्याचे परमात्मस्वरूपाचे चिंतवन करीत राहतो. परमात्मा बाहेर कोठे नसून शरीरातच पण शरीराहून भिन्न, अमूर्तिक, स्वसंवेदनगम्य अनंत चतुष्ट्यसंपन्न आहे.
परमातम सो आत्मा और न दूजो कोय ।
परमातमको ध्यावते यह परमातम होय ॥
आपला आत्माच परमात्मा आहे. दुसरा कोणी नाही. परमात्म्याच्या आपल्या शुद्ध स्वरूपाच्या चिंतवनाने व ध्यानाने हा आत्माच परमात्मा होतो. म्हणून सतत मी परमात्मा आहे. ‘परमात्मोऽहं’ ह्या जाप्यात मन गुंतवावे. इतरवेळी मन रिक्तच असते. त्यावेळी इतर विचाराकडे मनाला न जाऊ देता ह्या जाप्याकडे त्याच्या अर्थाकडे वळवावे. परमात्मा होण्याचा किती सोपा उपाय आहे हा! पण जे सोपे ते कठीण वाटते व जे कठीण त्याच्या मागे लागतो.
दुर्लभ परद्रव्यनको भाव, सो तो हि दुर्लभ है सुनि राव ।
जो तेरा है ज्ञान अनंत, सो नहि दुर्लभ सुनहु महंत ॥
आपला आत्मस्वभाव–अनंतज्ञान ते दुर्लभ नाही. तो तर स्वभाव आहे. परभावाची प्राप्ती दुर्लभ आहे. प्राप्त होणे शक्य नाही. आयुष्याचा एक एक क्षण मोलाचा आहे. काळ केव्हा झडप घालेल ह्याचा भरवसा नाही.
मानुष जनम पाय, सोबत विवाह जंगाय ।
खोवत करोरनकी इक इक धरी है ॥
गयो समय आवे नहीं सोनेहुके मोल ।
कहना था सो कह चुका कितना बजाऊ ढोल ॥
प्रश्न ५५ – परिणाम विशुद्धीसाठी नेहमी चांगल्या भावना करीत राहाव्यात, बाळगाव्यात असे आपण सांगितले पण भावना म्हणजे इच्छाच ना ? इच्छा तर हेय सांगितली आहे. ती तर बंधाला कारण आहे. मग भावना व इच्छा ह्यात फरक काय ?
उत्तर – भावना व इच्छा एक म्हणता येणार नाही. भावना म्हणजे ‘ज्ञाते अर्थे पुनः पुनःश्चिंतनम् भावना’ श्रद्धा, ज्ञान, चारित्र, यांचे पुनः पुनः अनुशीलन म्हणजे भावना. भावनेमुळे संस्कार दृढ होतात, आत्मसामर्थ्य वाढते. वारंवार केलेल्या संस्काराने चारित्र बनते. चारित्र्याने जीवन उन्नत होते. भावना ही ज्ञानाची व चारित्राची पर्याय आहे. इच्छा ही मोहाची पर्याय आहे. ती तर मोक्षमार्गामध्ये बाधक आहे. इच्छेच्या पूर्ण अभावानेच शुद्ध भाव होतात म्हणून इच्छा ही हेयच आहे.
प्रश्न ५६ – आपण ज्याला शुभ भावना म्हणतो त्यातही इच्छा असतेच का ? जसे माझ्या सर्व दुःखाचा नाश होवो, कर्माचा क्षय होवो, बोधिलाभ होवो. सर्व प्राण्याचे कल्याण होवो ह्या सर्व इच्छाच ना ?
उत्तर – नाही. जोपर्यंत संपूर्ण मोहाचा अभाव झाला नाही तोपर्यंत मिश्र अवस्था असते. इच्छा व भावना मिश्र रूपाने असतात. त्यामुळे साधारणपणे सकृत्दर्शनी सारख्याच वाटतात. भावनेबरोबर इच्छा जर कदाचित असली तर ती अल्प असते. मोहनीयच्या मंद उदयात अथवा क्षयोपशमात अशा शुभ भावना होतात व संपूर्ण मोहाच्या अभावात शुद्ध भाव होतात. भाव, भावना, परिणाम हे स्वभाव वाचक आहेत.
थोडक्यात, स्थूलपणे दोन्हीत फरक असा की, आत्मगुणांच्या विकासाचा, स्वरूपप्राप्तीचा, परजीवाच्या कल्याणाचा, त्यांच्या गुणविकासाचा भाव ज्यात असतो ते सर्व भावना कोटीमध्ये येतात व परद्रव्याच्या प्राप्तीची, विषयोपभोगाची, विषयसुखाची जी अभिलाषा ते सर्व इच्छा कोटीमध्ये येतात.
प्रश्न ५७ – एकंदरीत भावना व इच्छा एक नव्हे तर ?
उत्तर – नव्हे, ‘यादृशी भावना यस्य सिद्धिर्भवती तादृशी । भावना भावनानिशी’ ह्या ठिकाणी भावनेचा अर्थ इच्छा नाही. येथे भावना म्हणजे दृढ आत्मश्रद्धा असाच अर्थ घ्यायचा. समीचीन श्रद्धाच संसाराचा नाश करणारी आहे. निरंतर केलेल्या भावनेनेच श्रद्धा दृढ होते. यो यत् श्रद्धः स एव सः। ज्याची जेवढी श्रद्धा तेवढी त्याची किंमत. मोठ्या माणसाची आत्मश्रद्धा बलवान असते. ज्ञानाचे वारंवार संस्कार झाल्याने श्रद्धा दृढ होते. भावनेचे फार मोठे महत्त्व आहे. भावना तर जैन धर्माचा प्राण आहे. भावनेने दुःखाचा नाश होतो. तर इच्छेने आकुलता व दुःख वाढते म्हणून...
..... भावना चात्मतत्त्वे ।
संपद्यन्तां मम भव – भवे यावदेतेऽपवर्गः ॥
भावे भावना भाइए भावे केवलज्ञान इत्यादी व त्याचप्रमाणे षोडशकारण भावना, दशधर्म भावना इत्यादीचेच महत्त्व शास्त्रात ठिकठिकाणी सांगितले आहे. हे सर्व भवविनाशक व मोक्षकारक आहेत.
प्रश्न ५८ – मग इच्छा हेयच ना ?
उत्तर – ह्यात काय संशय. वीतेच्छा म्हणजे निरिच्छा. हेच सर्वस्वी उपादेय आहे. वीतरागताच श्रेष्ठ आहे व हेच आपले ध्येय आहे.
प्रश्न ५९ – मग चांगल्या गोष्टींची तरी इच्छा करावी की नाही?
उत्तर – इच्छेचे दोन प्रकार आहेत. एक शुभ इच्छा व दुसरी अशुभ इच्छा. अशुभ इच्छा तर सर्वस्वी हेयच ती पाप बंधाला व दुर्गतीला कारण आहे. संपूर्ण इच्छेचा अभाव होईपर्यंत शुभ इच्छा कथंचित् उपादेय आहे.
प्रश्न ६० – शुभ इच्छेनेही बंधच होतो ना ? मग कथंचित् उपादेय कशी ?
उत्तर – चांगल्या तारक गोष्टींची इच्छा सर्वस्वी बाधक नाही. ‘मनोरथापि श्रेयोर्थाः श्रेयोऽनुबन्धनः’ कल्याणाशी संबंधित मनोरथ कल्याणाचा टप्पा गाठण्यास रथाचे काम करतात. संसारसुख व विषयोपभोगाची इच्छा आणि आत्मकल्याणाची इच्छा ह्यात जमीन अस्मानाप्रमाणे महदंतर आहे. पहिली सर्वस्वी बाधक आहे तर दुसरी तारक आहे.
ज्ञानी जीवाची इच्छा संसारविषयक कधीच असत नाही. नेहमी मोक्षविषयकच असते. मोक्षे चित्तं भवे तनूः। ही त्याची अवस्था असते.
अज्ञानीची ह्या उलट असते. अज्ञानी संसार वाढावा अशी इच्छा करतो – सुखी संसाराची अपेक्षा करतो व ज्ञानी संसाराचा अभाव व्हावा अशी इच्छा करतो. दोघांच्या इच्छेत महदंतर आहे.
प्रश्न ६१ – कोणतेही कार्य करण्यासाठी इच्छेची जरुरी आहे ना ? इच्छेवाचून कार्य होत नाही. मोठमोठी महत्त्वाकांक्षी माणसं तीव्र इच्छेने प्रेरित होऊनच विशेष कार्य करतात. इच्छेवाचून कोणतीही क्रिया घडलेली दिसत नाही.
उदाहरणार्थ – ‘‘माझी तीव्र इच्छा म्हणूनच दर्शनाला आलो ना ?’’
उत्तर – ही मान्यता अत्यंत चुकीची आहे. इच्छेने कार्य होते असे समजणे हा भ्रम आहे, अज्ञान आहे. कधी कधी आपली इच्छा व अन्य वस्तूंचे परिणमन यांचा मेळ दिसून येतो. त्यामुळे इच्छेने कार्य झाले असे वाटते; परंतु तो भ्रम आहे. इच्छेचा व कार्यसिद्धीचा परस्पर अविनाभावी संबंध नाही हे लक्षात ठेवावे. छद्मस्थ अवस्थेत अनेक कारण सामग्रीमध्ये कधीकधी इच्छा ही एक असते व अनेक कार्य कलापांनी (त्यांचा मेळ असला तर) कार्य होते. जसे – गाडीच्या सावलीखाली चालणारा कुत्रा, ‘गाडी चालते.’ ती माझ्यामुळेच असे समजतो. त्याप्रमाणे इच्छेनेच कार्य झाले किंवा होते असे समजणे भ्रम आहे. अज्ञान आहे. कार्य होते ते पुण्याच्या उदयाने, पुण्याचा उदय असला तर इच्छा न करताही कार्य होते व पापाचा उदय असला तर तीव्र इच्छा करूनही, प्रयत्न करूनही कार्य होत नाही. उलट कर्मबन्धच होतो. कारण इच्छा ही मोहाची पर्याय आहे. मोहाने बंधच होईल. त्यातून तीव्र इच्छा, तीव्र आसक्ती म्हणजे तीव्र मोहच. त्याने तीव्र बंध होईल. अर्धांग वायूने हातपाय लुळे पडले असता तीव्र इच्छा करूनही हातपाय हलवू शकत नाही किंवा कंपवायू झाला असता इच्छा करूनही कंप थांबत नाही.
ह्या उलट इच्छा नसतानाही उत्तमोत्तम पुण्यसामग्री व अलौकिक वैभव श्री अरिहंत भगवंतांच्या चरणी लोटांगण घालते. त्यांचे हे अलौकिक महात्म्य निरिच्छपणाचे, वीतरागतेचे फळ आहे. इच्छेचे नव्हे.
अरिहंत भगवंतांकडून तीर्थोद्धाराचे जे महान कार्य होते ते तिन्ही जगाकडून होत नाही. म्हणून निरिच्छतेनेच खरे कार्य होते. कर्म नाशाचे सर्वात महान कार्य निरिच्छ जीवच करू शकतो. इच्छेने – इच्छा करून कर्माचा नाश होऊ शकत नाही. जितक्या अंशाने इच्छेचा अभाव तितक्या अंशाने कर्माचा नाश व जितक्या अंशाने इच्छेचा सद्भाव तितक्या अंशाने कर्मबंध होतो हा सिद्धांत आहे.
प्रश्न ६२ – सध्या जगात बहुधा अन्यायी व वाममार्गी सुखाने जगतात आणि न्यायाने सदप्रवृत्तीने वागणाऱ्याचा उत्कर्ष तर राहोच पण कधी कधी उलट अन्याय व आपत्ती सहन कराव्या लागतात. असे का व्हावे हे कोडे अजून उलगडत नाही.
उत्तर – तत्त्वज्ञानाने व वस्तुस्वभावाच्या यथार्थ ज्ञानाने हे कोडे उलगडेल. कर्माचा उदय, क्षयोपशम नाना जीवांचे नाना प्रकारचे असतात. णाणा जीवा णाणा कम्मं णाणा विह हवे लद्धिं ।
वर्तमान परिस्थिती ही पूर्व व वर्तमान पापपुण्याची बेरीज–वजाबाकी रूपाने असते. हे तत्त्व तुम्हाला मागे समजावून सांगितलेच आहे. तुम्ही केवळ वर्तमानाकडे लक्ष देऊ पाहता. पण त्या जोडीला पूर्व पापपुण्याचा उदयही असतोच व त्या सर्वांची बेरीज–वजाबाकी होत राहते ते तत्त्व निश्चित माहीत असले तर दुसऱ्याचे वैभव–यश पाहून वैशम्य–आश्चर्य होणार नाही.
वस्तुतः आपण खऱ्या मूल्यवान वस्तू ओळखत नाही व क्षुल्लक क्षुल्लक गोष्टींना महत्त्व देतो. अमोल अशी अनंतज्ञानादि चार रत्न आपणाजवळ आहेत. शिवाय वीतराग देव, निर्ग्रंथगुरु, जिनधर्म व जिनवाणी हे आपणास लाभलेत. दुर्लभ मनुष्य जन्म, सुकुल आदिची प्राप्ती झाली आहे. हे केवढे मोठे भाग्य आहे आपले. परंतु आपल्या जवळ जे असते त्याची किंमत आपल्याला असत नाही आणि भलतीच अपेक्षा करतो. ‘अतिपरिचयादवज्ञा’ असे होते. आपली किंमत आपण ओळखत नाही. इतर सामान्य गोष्टी पाहून स्वतःला कमी प्रतीचे समजतो. अनंतज्ञानादी अमोल रत्ने आपल्याजवळ असून स्वतःला दरिद्रीच समजतो. आपल्या
अनंत ज्ञानाच्या एका अविभाग प्रतिच्छेदापुढे तिन्ही जगाची संपत्ती ओवाळून टाकावी एवढी ज्ञानाची किंमत आहे. एवढी आपली योग्यता आहे हे लक्षात घ्या.
अज्ञानी मिथ्यादृष्टी आपले मूल्यमापन बाह्य गोष्टींनी करतो व ज्ञानी सम्यग्दृष्टी आपल्या अंतरंग शुद्ध–अशुद्ध परिणामांनी करतो. मिथ्यादृष्टीचे मोजण्याचे माप वेगळे व सम्यग्दृष्टीचे वेगळे. एक बाह्य गुणांनी मोजतो तर दुसरा आपल्या अंतरंग गुणांनी, त्याच्या विकासाने मोजतो. खरी संपत्ती आत्म्याचे गुण, रत्नत्रय, बोधिलाभ हीच आहे. अशी ज्ञानी जीवाची अकाट्य श्रद्धा असते.
थोडक्यात बहिरात्म्याची, अज्ञानी जीवाची सर्व बाह्यदृष्टी असते व अंतरात्म्याची, ज्ञानी जीवाची अंतरंग शुद्ध परिणतीकडे असते.
प्रश्न ६३ – आपण सांगितले ते अगदी खरे आहे ह्यात बिलकुल शंका नाही. माझी शंका अशी की धडधडीत अन्याय, खोटे पापकर्म करीत असूनही त्यांचे कार्य सफल किंवा यशस्वी का व्हावे ?
उत्तर – खोल विचार केला तर तो त्यांच्या पापाचाच उदय होय.
प्रश्न ६४ – त्यांच्या कार्यात सफलता मिळणे किंवा यशस्वी होणे हा पापाचा उदय कसा ?
उत्तर – कर्माचे फळ कधी तत्काल तर यथाकाल त्याच्या उदयकाळी मिळते. जर त्यांचे पूर्वोपार्जित पुण्य तीव्र अर्थात बलवान असेल तर ते त्यावेळी सफल किंवा यशस्वी होतात पण ते यश किंवा सफलता पापप्रवृत्ती वाढविते. पापाचरणास प्रोत्साहित करते. त्यामुळे त्यांच्याकडून अधिकाधिक पापे व अन्याय होत जातात. त्या यशाने मद्याप्याप्रमाणे अधिकाधिक मदांध होतात व तीव्र पापबंध बांधून परिणामी तीव्र दुःखदायक दुर्गतीला जातात.
जे पुण्य तत्कालीन यश किंवा सुख देऊन परिणामी भयंकर दुःख देते. त्या पुण्याला पुण्य तरी कसे म्हणावे ? की जे उंच शिखरावर नेऊन खाली पटकते. असले पुण्य काय कामाचे ? ते पुण्य विषफळासारखे आहे. विषफळ दिसण्यास मोहक नि सुंदर, खाण्याला अत्यंत मधुर पण परिणामी घातक असते. त्याप्रमाणेच पाप वा अन्यायाने सुखी व यशस्वी दिसणाऱ्यांचे आहे. ते परिणामी अत्यंत दुःखभागी होतात. मग त्यांचे तत्कालीन यश वा सुख हेदेखील त्यांच्या तीव्र पापाचा उदय नव्हे का ? की जे शेवटी दुर्गतीला पोचवते. वर्तमानकाळी त्यांचे जे पुण्य दिसते ते पापानुबंधी पुण्यफळ होय. सध्या सुखी वा यशस्वी दिसतात, पण ते पापानुबंधी–पापाचा बंध करणारे असते. म्हणून अशा पुण्याची की जे दुर्गतीला नेणारे आहे त्याची चुकूनही अभिलाषा करू नये.
आचार्य योगीन्द्र देवांनी परमात्मप्रकाश ग्रंथात म्हटले आहे.
पुण्ण्येण होई विहवो विवहेणमओ मएण मइ–मोहो ।
मइमोहेण य पापं तं पुण्णं अम्ह मा होउ ॥
पुण्याने वैभव मिळते, वैभवाने मद उत्पन्न होतो, मदाने मती मूढ होते – मोहीत होते, मती मोहीत झाल्याने पाप होते, असे पुण्य आम्हाला नको.
पुण्याचा–पुण्यफलाचा सदुपयोग करणे अगर दुरुपयोग करणे आपल्या हाती आहे. आपल्या स्वाधीन आहे. पुण्याने अनेक उत्तमोत्तम गोष्टी आपल्याला मिळाल्या आहेत, त्यांचा क्षणिक मोहाच्या बळी न पडता त्याचा सत्कारणी दानधर्म, व्रत, संयम, परोपकार आदी कार्यात उपयोग केला तर ते परंपरेने मोक्षसुख देणारे होते. तुम्हाला ती गोष्ट आठवते का ?
प्रश्न ६५ – कोणती? ती आपण सांगा महाराज.
उत्तर – ऐका तर, चार प्रवासी देशांतरला निघाले होते. जाता जाता त्यांना एक जंगल लागले. त्या जंगलातून जाताना त्यांचा रस्ता चुकला. भटकून भटकून थकले. त्यांना फार भूक लागली. जवळची शिदोरी संपलेली. आता काय करावे समजेना? अखेर दमून ते एका झाडाखाली बसले. त्यांच्यापैकी एकाची दूरवर फळाने बहरलेल्या झाडावर दृष्टी गेली. तो बाकीच्यांना म्हणाला, ‘ते ते पहा त्या... झाडाला किती सुंदर फळे लागली आहेत. ती खाऊया चला.’ ते पाहून सर्वजण तिकडे गेले. झाडाची मोहक फळे पाहून त्यांच्या तोंडाला पाणी सुटले. केव्हा खाऊ असे त्यांना झाले. चौघांनी ती फळे भराभर तोडली व ती घेऊन झाडाखाली बसले व फळ चाखून पाहू लागले. ‘आहाहा! काय गोड आहेत’ म्हणत म्हणत त्या चौघांपैकी तिघांनी ती खाण्याचा सपाटा चालवला व एक जण स्वस्थ बसून राहिला. कारण त्याला एकदम आठवण झाली की आपण गुरूजवळ अजाण फळ (ज्या फळासंबंधी माहिती नाही असे फळ.) खायचे नाही असा नियम घेतला आहे. हे फळ कशाचे आहे हे आपल्याला माहीत नाही. कधी पाहिले नाही व नावही ठाऊक नाही. मग मी ही खाऊ कशी? असा विचार करून
तो स्वस्थ बसला होता. त्या तिघांनी त्याला ‘अरे खा की, स्वस्थ का बसलास. पहा ती किती गोड आहेत’ म्हणून त्याला खाण्याचा आग्रह करू लागले. तेव्हा त्याने आपले व्रत त्यांना सांगून मी ही खाऊ शकत नाही असे म्हणून तो दूर जाऊन बसला. त्या तिघांनी त्याला वेड्यात काढले. ‘‘अरे वेड्या असा दूर का बसलास? उगाच उपासी का मरतोस? पहा, तरी किती गोड आहेत ही.’’ असे त्याला आग्रह करून बोलवू लागले. पण त्याने मी व्रत भंग करणार नाही मग तरी कितीही गोड असोत किंवा भुकेने प्राण जावो, असे निक्षून त्यांना सांगितले. त्याचे उत्तर ऐकून त्यांनी त्याचा नाद सोडला व त्या फळावर यथेच्छ ताव मारला. खाताखाता त्यांना गुंगी येऊ लागली व अखेर ते तिथेच आडवे झाले ते कायमचेच. उठलेच नाहीत. अर्थात ते मरून पडले.
ज्याने ती फळे खाल्ली नव्हती त्यालाही भुकेने ग्लानी आली व तो ही झाडाखाली झोपला. थोड्या वेळाने जागा होऊन पाहतो तो आपले सोबती स्वस्थ झोपलेत. त्यांना उठवावे म्हणून तो त्यांच्याजवळ जाऊन त्यांना उठवू लागला. खूप हलवून पाहिले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की हे मेलेत. असे एकाएकी का झाले ह्याचा त्याला उलगडा होईना. अस्वस्थपणे तिथे बसून राहिला. इतक्यात एक वाटसरू तिकडून चालला होता. त्याने दृश्य पाहिले व त्याला विचारले. ‘ह्यांनी ह्या झाडाची फळे खाल्ली काय?’ तो होय म्हणाला. ते ऐकून तो वाटसरू म्हणाला, ‘घात झाला’ हे तर विषवृक्ष आहे. ह्याची फळे फार विषारी असतात. ह्या मुळेच या बिचाऱ्यांचा मृत्यू झाला. ते ऐकून तो प्रवासी विचार करू लागला. एवढ्याशा व्रताने – संयमाने ह्या विषफळापासून माझा जीव वाचला महाभाग्य माझे.
सारांश – त्या तीन प्रवाशांची तत्कालीन भूक भागली. एवढ्यापुरते त्यांचे ते पुण्य (पुण्यफल) समजा, पण शेवटी प्राणाला मुकावे लागले. मग त्यांचे पुण्यफल प्राणघातक झाले ना? व जो वाचला त्याचाही त्यावेळी
पुण्याचा उदय होताच ना? म्हणून त्याला भूक शमवण्याची संधी मिळाली. पण त्यावेळी लोभाला-मोहाला बळी न पडता संयम बाळगून विवेकाने वागला तो वाचला. ह्यावरून **पुण्याच्या उदयकाळी त्या पुण्यफळामध्ये वाहवून न जाता-मोहाधीन न होता त्या पुण्याचा-प्राप्त संधीचा विवेकाने सदुपयोग करणे, मोहावर विजय मिळविणे आपल्या स्वाधीन आहे.**
जे तत्कालीन सुखाकडे पाहतात, परिणामाकडे लक्ष देत नाहीत. ते सुखी व यशस्वी वाटतात, पण तो भ्रम आहे.